Pune: मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला करणारे 'ते' 6 जण अटकेत, नावंही आली समोर!

राहुल गायकवाड

• 12:30 PM • 26 Nov 2026

पुण्यातील मंदार किवळे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. यातील पाच आरोपींना आज दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

pune crime news court firing case mandar kivale attack 6 accused arrested

पुण्यातील आरोपी अटक

Google CTA

पुणे: पुण्यातील मंदार किवळे याच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पाच प्रौढ आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईमुळे पुण्यातील कोर्ट फायरिंग प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना आज (26 नोव्हेंबर) दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंदार किवळे याच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 109(1), 189(2), 189(4), 191(3), 190 आणि 61(2) अंतर्गत आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> पुणे: कोयत्याने अक्षरश: हात तोडले.. कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेचं नेमकं झालं तरी काय?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अक्षय सुभाष चव्हाण (वय 20), अमोल रामचंद्र चव्हाण (वय 48), स्वप्नील बाजीराव गवळी (वय 28), ओंकार संतोष पवार (वय 18) आणि सूरज साधू माळेकर (वय 22) यांचा समावेश आहे. याशिवाय एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पाच आरोपींना न्यायालयात करणार हजर 

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांपैकी पाच प्रौढ आरोपींना शिवाजीनगर पोलीस दुपारी पुणे न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयात आरोपींना हजर केल्यानंतर तपासाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहे. या आरोपींच्या चौकशीतून हल्ल्याशी संबंधित आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

मंदार किवळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असली, तरी या घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचे नियोजन आणि इतर संभाव्य सहभागींविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, याकडे लक्ष लागले आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.