पुणे: कोयत्याने अक्षरश: हात तोडले.. कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेचं नेमकं झालं तरी काय?
पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार मारुती किवळे याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. ससून रुग्णालयाचे डीन यांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली असून, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर भरदिवसा मंदार मारुती किवळे या आरोपीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यात मंदारच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून डोक्याच्या मागील बाजूला फ्रॅक्चर झाले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून सध्या ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव यांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
नेमका हल्ला कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ ही घटना घडली. मंदार किवळे न्यायालयाच्या गेटच्या दिशेने जात असताना चार ते पाच हल्लेखोर शस्त्रे घेऊन त्याच्या मागे धावत आले. त्यानंतर त्यांनी त्याला घेरून धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात मंदारच्या हाताला आणि मानेच्या भागाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा>> पुण्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! कोर्टाबाहेर गोळीबार, तरुणावर कोयत्याने सपासप वार
मंदार किवळेची प्रकृती अत्यंत चिंताजनक
ससून रुग्णालयाचे डीन येल्लाप्पा जाधव यांनी मंदारच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्याच्या उजव्या आणि डाव्या हाताला गंभीर जखमा झाल्या असून डोक्याच्या मागील बाजूला फ्रॅक्चर आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. उजव्या हाताला आणि पाठीला गोळी चाटून गेल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील 72 तास त्याच्यासाठी महत्त्वाचे असून रक्तस्रावाचे प्रमाण आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील उपचार निश्चित केले जाणार आहेत.
भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ला?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याची शक्यता समोर आली आहे. अक्षय चव्हाण हा या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याची माहिती आहे. त्याच्या भावाची सुमारे दोन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्या हत्या प्रकरणात मंदार किवळेही आरोपी होता. याच वैमनस्यातून मंदारवर हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा>> सांगली हादरली, चारचाकीला कट मारल्याचा वाद गळा चिरेपर्यंत पोहोचला, हरिपूरच्या तरुणाची हत्या
या हल्ल्यासाठी 10 ते 15 तरुणांना सुपारी देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. हे तरुण रात्रीपासून आंबेगाव परिसरात थांबले होते आणि संधी साधून त्यांनी न्यायालयाबाहेर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मंदार किवळे याच्याविरोधात 2025 मध्ये हत्या प्रकरण दाखल झाले होते. तो नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. दरम्यान, सुरुवातीला गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पुणे पोलिसांच्या डीसीपी क्राइम यांनी डॉक्टरांना तपासणीदरम्यान शरीरावर गोळी लागल्याचे निशाण आढळले नसल्याचे सांगितले होते. दुसरीकडे, ससून रुग्णालयाच्या डीन यांनी गोळी चाटून गेल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन शस्त्रे जप्त केली असून संशयितांची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. न्यायालयाबाहेर झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यातील न्यायालयीन परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
