पुण्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! कोर्टाबाहेर गोळीबार, तरुणावर कोयत्याने सपासप वार
पुण्यातील सत्र न्यायालयाबाहेर एक हादरवून टाकणारा प्रकार घडला. चौघांनी मिळून एका व्यक्तीवर गोळीबार आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात न्यायालयाबाहेरच गोळीबार
सत्र न्यायालयाबाहेर काय घडलं?
Pune Crime : पुण्यातील सत्र न्यायालयाबाहेर गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्याच्या मागे पिस्तूल आणि धारदार शस्त्रे घेऊन चार जण धावत होते. या चौघांनी पळणाऱ्या व्यक्तीवर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर त्याला गाठून हातावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार केले. मंदार किवळे असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
चारही आरोपी फरार
या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हल्ला केल्यानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
हे ही वाचा : 'भांडणं थांबवा आणि...', सुप्रिया सुळेंची 'त्या' गोष्टीसाठी सरकारला हात जोडून विनंती!
गँगवारमधून हल्ला झाल्याची शक्यता
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पुण्यातील गँगवॉरमधून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरात यापूर्वीही टोळीयुद्धातून अशा प्रकारचे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या हल्ल्यामागे जुन्या वैमनस्याचा किंवा टोळ्यांमधील संघर्षाचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. हल्लेखोरांनी नेमक्या कोणत्या कारणातून हा हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा : सांगली हादरली, चारचाकीला कट मारल्याचा वाद गळा चिरेपर्यंत पोहोचला, हरिपूरच्या तरुणाची हत्या
कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न
विशेष म्हणजे, पुणे सत्र न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाबाहेर भरदिवसा गोळीबार आणि जीवघेणा हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या परिसरातच हल्लेखोर पिस्तूल आणि धारदार शस्त्रे घेऊन पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
