मुंबई : 'बॅग भरली होती, उद्या हॉस्टेलला जाणार होता...' पण काळाने घातला घाला; बिल्डरवर गंभीर आरोप

मुंबईतील नायगाव पूर्व येथे हृदयद्रावक घटना घडली. एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा अकराव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अकराव्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू

point

नेमकं काय घडलं?

Mumbai News : नायगाव पूर्वेकडील नवकार टॉवर सोसायटीमध्ये अकराव्या मजल्यावरून पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (24 नोव्हेंबर) घडली. मिलीत दिनेशकुमार सुतार असे मृत बालकाचे नाव आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या निधनाचे दुःख पचवत असतानाच मुलाचाही मृत्यू झाल्याने सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास मिलीत अकराव्या मजल्यावरील लॉबीमध्ये एका लहान मुलीसोबत खेळत होता. यावेळी लॉबीतील खिडकीतून तोल जाऊन तो थेट खाली कोसळला. खाली असलेल्या अग्निशमन यंत्रणेच्या पाईपवर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सोसायटीतील रहिवाशांनी त्याला तातडीने वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.

हॉस्टेलमध्ये जाण्याआधीच काळाचा घाला

या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे, मिलीतला पुढील शिक्षणासाठी महाबळेश्वर येथील एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय त्याचे वडील दिनेशकुमार यांनी घेतला होता. बुधवारी सकाळी त्याला हॉस्टेलमध्ये सोडण्याची तयारीही पूर्ण झाली होती. त्याची बॅगदेखील भरून ठेवण्यात आली होती. मात्र, हॉस्टेलमध्ये जाण्याच्या आदल्याच दिवशी काळाने त्याच्यावर घाला घातला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डरच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लॉबीतील खिडक्यांना सुरक्षेसाठी जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी रहिवाशांनी वारंवार केली होती. मात्र, बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच सोसायटीतील लिफ्टची अवस्थाही खराब असून एका विंगमधील लिफ्ट बंद असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

हे ही वाचा : Weather Report: हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा? राज्यातील हवामानाचा नवा अंदाज समोर

जबाबदारी कोणाची?

विशेष म्हणजे, यापूर्वी 22 जुलै 2025 रोजी नवकार सिटी फेज-1 येथे 12 व्या मजल्यावरून पडून चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर नवकार टॉवरमधील रहिवाशांनीही अशा प्रकारची दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली होती. इमारतीतील खिडक्यांना सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, या मागणीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे इमारतींमधील लॉबी आणि खिडक्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा : पुण्यात IT कंपनीत दोघंही नोकरीला, 100 ते 200 कॉल... शुभमने कोमलला संपवलं अन्.. हादरवून टाकणारी Inside स्टोरी!

बिल्डरवर निष्काळजीपणाचा आरोप

या दुर्घटनेप्रकरणी बिल्डरच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. वारंवार मागणी करूनही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसतील, तर त्याची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. एका निष्पाप बालकाचा जीव गेल्यानंतर तरी इमारतींमधील खिडक्या, लॉबी आणि इतर धोकादायक ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सुतार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखामुळे संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.