'भांडणं थांबवा आणि...', सुप्रिया सुळेंची 'त्या' गोष्टीसाठी सरकारला हात जोडून विनंती!

गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बंटी पाटील आणि त्यांच्या टीमला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारने भांडणं थांबवून सामंजस्याने गोकुळचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले.

ADVERTISEMENT

ncp sharad pawar leader supriya sule appeals maharashtra government to resolve gokul dispute
सुप्रिया सुळे
Google CTA

कराड: कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला थेट आवाहन केले आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि त्यांच्या टीमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याचे स्पष्ट करतानाच, न्यायालयीन लढाई आणि आपापसांतील संघर्षापेक्षा चर्चेतून प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. "मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करते, भांडणं थांबवा आणि गोकुळचा प्रश्न सोडवा," असे म्हणत त्यांनी शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या अडचणींकडेही लक्ष वेधले. त्या कराडमध्ये बोलत होत्या.

कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना  सुप्रिया सुळे यांनी गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षावर आपली भूमिका स्पष्ट केली. गोकुळच्या निकालाकडे कसे पाहता आणि 80 लाख रुपये वकील फीचा मुद्दा चर्चेत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सतेज पाटील आणि त्यांच्या टीमला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. बंटी पाटील यांच्याशी आपले भावासारखे कौटुंबिक संबंध असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. गोकुळच्या वादात सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बंटी दादा आणि त्यांचे माझे भावासारखे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मी अंतःकरणातून पूर्ण ताकदीने बंटी दादा आणि त्यांच्या टीमच्या पाठीशी आहे." मात्र, या संपूर्ण प्रकरणात केवळ निवडणुकीतील जय-पराजय किंवा न्यायालयीन लढाई यापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

'सहकार चळवळ ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यानंतरच्या अनेक मोठ्या नेत्यांनी जिवंत ठेवली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत जो जिंकेल तो सिकंदर, अशी भूमिका घेतली असती, तर अधिक योग्य ठरले असते. एखादे मत कमी-जास्त झाले असते, तरी न्यायालयीन लढाई करण्याऐवजी सरकारने सामंजस्याने चर्चा करून प्रश्न सोडवायला हवा होता', असे त्या म्हणाल्या.

"भांडणं करून प्रश्न सुटणार नाहीत!"

गोकुळच्या वादावर बोलताना त्यांनी शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. आज शेतकरी अडचणीत आहे. दूध व्यवसायासमोरही अनेक अडचणी आहेत. अशा परिस्थितीत आपापसातील भांडणांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, यावर चर्चा होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा>> गोकुळ दूध संघ : बाजू मांडण्यासाठी वकिलाची फी 80 लाख रुपये; सरकारचा नवा जीआर काय सांगतो?

यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारला थेट आवाहन केले. "या पवित्र वास्तूतून मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला हात जोडून नम्र विनंती करते की, गोकुळचा प्रश्न सोडवा," असे म्हणत त्यांनी सरकारने या वादात मध्यस्थी करून तोडगा काढण्याची मागणी केली.

अजितदादांच्या आठवणीने सुप्रिया सुळे भावुक

दरम्यान, कराडमध्ये आल्यानंतर माहेरी आल्यासारखे वाटते, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. गेल्या जवळपास चार दशकांपासून शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी वर्षातून दोन वेळा कराडला येतात. 12 मार्च आणि 25 नोव्हेंबर ही परंपरा त्यांनी कधीही खंडित होऊ दिली नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांतून आणि संस्कारांतून महाराष्ट्राला दिशा मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा>> सेंटर पॉईंट : भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, वचपा काढला?

यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "दादा गेली दोन-तीन वर्षे नियमाने येथे येत होते. दुर्दैव आहे. दादांना जाऊन उद्या 28 तारखेला जवळपास दहा महिने पूर्ण होतील. अनेक वेळा मलाही असं वाटत नाही की दादा आपल्यात नाहीत."

अशा प्रकारे कराडमधील संवादात सुप्रिया सुळे यांनी एका बाजूला गोकुळच्या वादावर सरकारला सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनाही व्यक्त केल्या.