गोकुळ दूध संघ : बाजू मांडण्यासाठी वकिलाची फी 80 लाख रुपये; सरकारचा नवा जीआर काय सांगतो?
गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षानंतर राज्य सरकारने सहकार कायद्यात केलेल्या बदलाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरकारची बाजू मांडण्यासाठी मुकुल रोहतगी यांना 80 लाख रुपये देण्याच्या निर्णयावर सतेज पाटील यांनी टीका केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गोकुळ दूध संघ : सरकारची बाजू मांडण्यासाठी विधीज्ञ घेणार 80 लाख;
राज्य सरकारचा नवा जीआर काय सांगतो?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने सहकार कायद्यात केलेल्या बदलामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या बदलाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या 80 लाख रुपयांच्या शुल्काला सरकारने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील 23 नोव्हेंबर 2026 रोजीचा शासन निर्णय समोर आला आहे. या निर्णयावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्षेप घेत सरकारी तिजोरीतून 80 लाख रुपये खर्च करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीपासून सुरू झालेला वाद आता सहकार कायदा, न्यायालयीन लढाई आणि सरकारी खर्च अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर पोहोचला आहे.
हेही वाचा : सलग दुसऱ्यांदा पडळकरांचा गेम? सांगली भाजपमधूनच होतोय 'करेक्ट कार्यक्रम'?
5 शासननियुक्त संचालक आणि गोकुळची सत्ता महायुतीला मिळाली
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या गटाचे 13 संचालक निवडून आले होते, तर महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित गटाचे 12 संचालक निवडून आले होते. संचालक मंडळाचा कोरम पूर्ण करण्यासाठी 14 सदस्यांची आवश्यकता होती. मात्र, दोन्ही गटांच्या संख्याबळामुळे अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 एए2 मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. या बदलानुसार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या पात्र सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त सदस्य नेमण्याची तरतूद करण्यात आली. यापैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला असून, एका सरकारी अधिकाऱ्याला मतदान करता येणार नाही. या कायद्यातील बदलानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या तरतुदीतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे गोकुळच्या संचालक मंडळातील संख्याबळाचे राजकीय गणित बदलण्याचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा : शिंदेंचा डोळा 'त्या' 4 आमदारांवर?... राष्ट्रवादीचे आमदार पहिले कोण फोडणार?
सरकारी तिजोरीतून 80 लाख रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप
दरम्यान, राज्य सरकारच्या या अध्यादेशाला शशिकांत आनंद पाटील चुयेकर आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रिट याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या प्रकरणात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारत सरकारचे माजी महान्यायवादी मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहतगी यांनी या प्रकरणात न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी 80 लाख रुपयांचे देयक सादर केले होते. त्यानुसार वित्त विभागाने या रकमेच्या वितरणाला मंजुरी दिली आहे. मात्र, आयकराच्या नियमानुसार 10 टक्के रक्कम कपात केली जाणार असून, रोहतगी यांना प्रत्यक्षात 72 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम संपूर्ण सुनावणीची फी नसून सुरुवातीच्या कामासाठी सादर करण्यात आलेले देयक आहे.
या शासन निर्णयावर सतेज पाटील यांनी सोशल मीडियावरून टीका केली. राज्यात दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना आणि विकासकामांसाठी निधी कमी पडत असताना गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी केलेल्या कायद्यातील बदलाचे समर्थन करण्यासाठी सरकारी तिजोरीतून 80 लाख रुपये खर्च केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सरकारने जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याची भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे, सरकारच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी होणाऱ्या खर्चावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात न्यायालयीन लढाईदरम्यान दोन महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. पहिला प्रश्न म्हणजे शासननियुक्त पाच सदस्यांपैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याची तरतूद कायद्याच्या कसोटीवर टिकणार का? यापूर्वी अमूलच्या प्रकरणात शासननियुक्त सदस्यांच्या भूमिकेचा संदर्भ न्यायालयात दिला जाऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकारने केलेला कायद्यातील बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येईल का? म्हणजेच, कायद्यात बदल होण्यापूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला हा बदल लागू करता येईल का? यावर न्यायालयात युक्तिवाद होऊ शकतो.
मुकुल रोहतगी यांना सरकारची बाजू मांडताना या दोन्ही मुद्द्यांवर कायदेशीर भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. यापूर्वी 2019 मधील पहाटेच्या शपथविधी प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षात अजित पवार यांच्या बाजूने रोहतगी यांनी युक्तिवाद केला होता. आता गोकुळ प्रकरणातील कायद्यातील बदल न्यायालयात टिकणार का, याकडे लक्ष लागले आहे. सरकारने केलेला हा बदल सहकार क्षेत्रासाठी योग्य आहे की त्यामागे गोकुळमधील सत्तेचे राजकीय गणित आहे, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
