शिंदेंचा डोळा 'त्या' 4 आमदारांवर?... राष्ट्रवादीचे आमदार पहिले कोण फोडणार?

माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सोबत घेण्यासाठी शिंदेंची पश्चिम महाराष्ट्रात रणनीती काय आहे?

ADVERTISEMENT

Eknath Shinde
Eknath Shinde
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शिंदेंचा डोळा 'त्या' 4 आमदारांवर?... राष्ट्रवादीचे आमदार पहिले कोण फोडणार?

point

Eknath Shinde यांचा NCP SP MLA वर नजर? त्या चर्चा का घडवून आणल्या जातायत?

Maharashtra Politics : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले नाही.  तरी चौथा घटक म्हणून त्यांचा महायुतीमध्ये समावेश होणार असेल, तर भाजप त्याचे स्वागत करेल, अशा स्वरूपाची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू झाली. खरंच अशा काही घडामोडी घडत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला. कारण ज्या शरद पवारांना सातत्याने आव्हान देताना देवेंद्र फडणवीस दिसतात, त्या पवारांना सोबत घेण्यासाठी भाजप कसा तयार होऊ शकतो, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. गेल्या दहा वर्षांत पवार विरुद्ध फडणवीस असा राजकीय सामना अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आहे. त्यामुळे भाजपची ही भूमिका नेमकी काय असू शकते, याचा विचार करताना त्याचवेळी घडणाऱ्या इतर राजकीय घडामोडींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. या घडामोडींचा विचार केला, तर या बातमीमागची काही कारणं समोर येऊ शकतात.

शिंदेंचं सोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदारांकडे लक्ष 

दोन दिवसांपूर्वी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला गेले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील त्यांच्यासोबत सातत्याने दिसून आले. अगदी उत्सवाच्या वेळीही ते एकनाथ शिंदेंसोबत होते. त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी अभिजीत पाटील यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. तुम्ही आमच्यासोबत आलात, तर तुम्हाला मंत्रिपदही देऊ, अशी ऑफर त्यांनी दिल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे अभिजीत पाटील यांच्या घरीही गेले. याबाबत माध्यमांशी बोलताना अभिजीत पाटील यांनी नेहमीप्रमाणेच उत्तर दिलं. उपमुख्यमंत्री जिल्ह्यात येत असतील, तर त्यांना भेटणं भाग आहे, असं ते म्हणाले. मात्र, या सगळ्या घडामोडींकडे केवळ एका नेत्याच्या भेटीपुरतं पाहून चालणार नाही. कारण महायुतीसोबत जवळीक वाढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ अभिजीत पाटील हे एकमेव आमदार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्येही एक प्रकारची अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहिलं, तर विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही ही नाराजी दिसून आली होती. राजेंद्र राऊत विरुद्ध देशमुख या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीला साथ दिली होती. त्यात माळशिरसचे उत्तमराव जानकर यांचाही समावेश होता. या नाराजीमागे स्थानिक राजकारणातील काही कारणं होती. देशमुख यांनी पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्याचं काम केल्याचा अभिजीत पाटील यांचा आक्षेप होता. त्यामुळे अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी कशी देऊ शकते, असा प्रश्न काही आमदारांनी उपस्थित केला होता. परिणामी, त्यांनी विधान परिषद निवडणुकीत महायुतीला साथ दिल्याचं सांगितलं जातं. अभिजीत पाटील यांच्याबरोबरच उत्तमराव जानकर, करमाळ्याचे नारायण पाटील आणि मोहोळचे राजू शिंदे यांची नावंही या संदर्भात चर्चेत आहेत. हे आमदार महायुतीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर दिसतात. विशेष म्हणजे, त्यांची जवळीक केवळ भाजप नेत्यांशी नाही, तर एकनाथ शिंदे यांच्याशीही वाढताना दिसते.

या सगळ्या घडामोडींमध्ये महायुतीमधील अंतर्गत स्पर्धाही महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटून महायुतीत येणार असतील, तर ते नेमके कोणत्या पक्षात जाणार, हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांनी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रवींद्र धंगेकर हे भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतात. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत बंडखोर किंवा अपक्ष उमेदवार सानप यांना एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात शिंदे आपले राजकीय हातपाय पसरत असल्याचं दिसतं. अजित पवार यांच्या निधनानंतर या भागात शिंदे यांचा जोर आणखी वाढल्याचं चित्र आहे. बारामतीमध्ये त्यांनी एकनाथ भवनही सुरू केलं आहे. नुकत्याच झालेल्या सातारा आणि सांगली जिल्हा बँकांच्या निवडणुकांमध्येही भाजपला दूर ठेवण्यात आलं. उपाध्यक्षपद स्वीकारत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला साथ दिली. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत तडजोड करावी लागली, तरी भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न या घडामोडींमधून दिसतो. सातारा आणि सांगलीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचा बदला शिंदे यांनी घेतल्याची चर्चाही झाली. आता याच पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नेत्यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्नही एकनाथ शिंदे करत आहेत. यामध्ये अभिजीत पाटील यांचं नाव महत्त्वाचं ठरतं. ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचं राजकीय महत्त्व केवळ आमदार म्हणून मर्यादित राहत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. माळशिरस पंचायत समितीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असतानाही शिंदे यांच्या शिवसेनेला अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांची शिवसेना स्थानिक पातळीवर एकत्र येत असल्याचं चित्र दिसतं. याआधीच्या एका निवडणुकीत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही आमच्याकडे केवळ 16 मतं होती, मात्र आम्ही 110 पर्यंत मजल मारली, कारण आमच्यासोबत एक अदृश्य शक्ती होती, असं म्हटलं होतं. ही अदृश्य शक्ती म्हणजे केवळ एकनाथ शिंदे असं म्हणता येणार नाही. मात्र, शिंदे यांच्याकडून मदत केली जात असल्याचं आणि त्यासाठी प्रयत्न होत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळे सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नेत्यांना आपल्याकडे आणण्याचं एकनाथ शिंदे यांचं लक्ष्य असल्याचं दिसतं. पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे नेते मराठा समाजातील आहेत. अशा नेत्यांना सोबत आणण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत. कारण त्यांच्या शिवसेनेसोबत पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते मोठ्या प्रमाणात जोडले गेलेले नाहीत.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांना अद्याप अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणता आलेलं नाही. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि खासदारांवरही एकनाथ शिंदे यांचं लक्ष आहे. मात्र, त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि खासदारांनाही ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तयार उमेदवार आपल्याकडे असणं राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील सत्ता, पंचायत समित्या, जिल्हा बँका आणि सहकारी साखर कारखाने यांच्यावर प्रभाव असणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या संस्थांमधील राजकीय ताकदीचा फायदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही होऊ शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुरुवातीला उल्लेख केलेल्या इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीकडेही याच दृष्टिकोनातून पाहता येऊ शकतं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये चौथा घटक म्हणून घेण्याची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. या बातमीमागेही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं असू शकतात का, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकार क्षेत्राशी संबंधित आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तर त्यांची ताकदही वाढू शकते. 2019 पासून पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर काढून भाजपने आपल्यासोबत आणलं. त्यातून या भागात आपला राजकीय पाया मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपने केला. आता हेच प्रयत्न एकनाथ शिंदे करू लागले, तर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा जम बसलेला पाया कमकुवत होऊ शकतो का? त्यामुळे अशा बातम्या समोर आणल्या जात आहेत का, असाही प्रश्न उपस्थित होतो. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये जाण्यास किती इच्छुक आहेत, हा या राजकारणातील एक भाग आहेच. मात्र, त्याचवेळी एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने या नेत्यांना आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.