सलग दुसऱ्यांदा पडळकरांचा गेम? सांगली भाजपमधूनच होतोय 'करेक्ट कार्यक्रम'?

Gopichand Padalkar : सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांसारख्या मातब्बरांशी दोन हात करत भाजपचा किल्ला लढवणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना स्वतःच्याच पक्षातून डावलले जात असल्याचे चित्र गेल्या महिनाभरात सलग दोनदा समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Gopichand Padalkar
Gopichand Padalkar
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सलग दुसऱ्यांदा पडळकरांचा गेम? सांगली भाजपमधूनच होतोय 'करेक्ट कार्यक्रम'?

point

गोपीचंद पडळकर यांना स्वतःच्याच पक्षातून डावलले जात असल्याचे चित्र

Gopichand Padalkar : तळ राखील तो पाणी चाखील, अशी मराठीत एक म्हण आहे. पण सांगलीच्या राजकारणात अगदी या म्हणीच्या उलट घडामोडी सुरू आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील अशा मातब्बरांच्या खेळ्यांना तोंड देत आमदार गोपीचंद पडळकर हे सांगलीत भाजपचा किल्ला लढवतात. निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देतात. पण जेव्हा पक्षाकडून द्यायची वेळ येते, तळ्याचं पाणी चाखायची वेळ येते, तेव्हा मात्र दुसऱ्यालाच संधी दिली जात असल्याचं बघायला मिळतंय. गेल्या महिनाभरात सलग दोनदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना पक्षातूनच डावललं जात असल्याचं चित्र निर्माण झालंय.

सांगली भाजपमध्ये नेमकं काय पॉलिटिक्स शिजतंय? गोपीचंद पडळकरांचे पक्षातूनच पंख छाटण्याचं काम सुरू आहे का? याबाबतची सविस्तर विश्लेषण आपण समजून घेऊयात.. 

सुरुवातीलाच आपण सांगली जिल्ह्याचं नेमकं पॉलिटिक्स काय, त्यात भाजपचा रोल काय, हे समजून घेऊ. सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या 8 जागा येतात. त्यापैकी 4 जागांवर भाजपचे आमदार आहेत. सांगलीचे सुधीर गाडगीळ वगळले, तर उर्वरित तिन्ही आमदार हे ग्रामीण भागातून येतात. उरलेल्या चारमध्ये दोन आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, तर प्रत्येकी एक आमदार काँग्रेस आणि शिवसेनेचा आहे.

महायुतीत सर्वाधिक चार आमदार असल्यामुळेच भाजपचे चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. याच जोरावर भाजपने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवली. पण महापालिकेत मित्रपक्षांच्या कुबड्यांवरच भाजपला काठावरच्या बहुमताची सत्ता मिळाली.

जिल्हा परिषद निवडणुकीत पडळकरांनी मैदान मारलं, पण... 

जिल्हा परिषदेत 61 पैकी सर्वाधिक 16 जागा जिंकत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. पण भाजपला झेडपीत काही सत्ता मिळवता आली नाही. पण भाजपने जिंकलेल्या 16 जागांचं एक वैशिष्ट्य आहे. जत तालुक्यातल्या 9 पैकी 8 जागांवर पडळकरांच्या नेतृत्वात भाजपने एकहाती यश मिळवलं. म्हणजेच 16 पैकी एकट्या पडळकरांच्या जत मतदारसंघातल्या 8 जागांचा समावेश आहे. पडळकरांच्या नेतृत्वात भाजपने तालुक्यात नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दमदार कामगिरी केली.

दुसरीकडे जिल्हा बँकेतही महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनीही मिळून 21 पैकी 15 जागा बिनविरोध काढल्या. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून या जागा बिनविरोध काढण्यात आल्या. पण, फडणवीसांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणाऱ्या गोपीचंद पडळकरांना मात्र झुलवत ठेवण्यात आलं. पडळकर लढत असलेली जत सोसायटी गटाची जागा बिनविरोध निघाली नाही. यामुळे पडळकर समर्थकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. जिल्ह्यातलं भाजपचं प्रस्थापित नेतृत्व पडळकरांना स्थानिक राजकारणात सेटल होऊ देत नसल्याची कुजबुज सुरू झाली.

पक्षातूनच पडळकरांचा होतोय करेक्ट कार्यक्रम?

भाजपमधल्या पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे करेक्ट कार्यक्रम करण्याच्या हिशोबाने पडळकरांना निवडणुक रिंगणात उतरवल्याचं म्हटलं गेलं. सोशल मीडियावर या सगळ्यांस पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जबाबदार असल्याचे मेसेजही फिरले. पण चंद्रकांतदादांनी हे सगळे दावे, आरोप पत्रकारांना प्रतिक्रिया देऊन तेव्हाच फेटाळून लावले होते. या सगळ्यात पडळकर जत सोसायटी गटातून एकतर्फी जिंकले. आणि जिल्हा बँकेत एन्ट्री केली.

मात्र, या सगळ्यात आमदार पडळकर आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमधील राजकीय संघर्ष जिल्ह्याने अनुभवला. जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातला राजकीय संघर्ष चर्चेत राहिला. विशाल पाटलांसोबतही संघर्ष झाला. पण या सगळ्यात पडळकर हे एकाकी लढत राहिले. जिल्हास्तरीय पक्षनेतृत्व पडळकरांच्या पाठिशी दिसलं नाही.

पडळकर समर्थकांतर्फे आमदारांच्या डोक्यावर थेट मुख्यमंत्री फडणवीसांचा हात असल्याचं सांगितलं जातं. पण जिल्ह्यात मात्र पडळकर एकाकी दिसतात. जिल्ह्याच्या नेतृत्वाला पडळकर सत्तेसाठीचं संख्याबळ मिळवून देतात, विरोधकांशी दोन हात करतात पण जिल्ह्यातल्या सत्तेत वाटा द्यायची वेळ येते, तेव्हा दुसरेच वाटेकरी होतात, असं चित्र आहे.

जिल्हा बँकेत पडळकरांना संघर्ष करून संचालकपद मिळालं. आता जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य निवडीमध्ये 16 पैकी 8 सदस्य देणाऱ्या पडळकर गटाला वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या निवडीतही जतला स्थान मिळालं नाही. त्यामुळे पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत सदस्य संख्येच्या 10 टक्के स्वीकृत सदस्य नेमले जातात. ही निवड करताना कार्यकर्त्यांची राजकीय सोय, स्थानिक समीकरणं यांचा विचार केला जातो. सांगली जिल्हा परिषदेत 16 सदस्य असलेल्या भाजपच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्य आलाय. तिथं भाजपनं  विधान परिषदेच्या पुणे पदवीधरचं तिकीट नाकारलेल्या शरद लाड यांच्या पत्नीला संधी दिलीय. कुंडलचे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या शरद लाड यांच्या पत्नी धनश्री यांना संधी मिळालीय. विशेष म्हणजे, सरळ लढतीत, निवडणुकीत धनश्री यांचा पराभव झाला होता. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी धनश्री यांचा पराभव केला होता. त्याच धनश्री यांना स्वीकृत सदस्य म्हणून जिल्हा परिषदेवर धाडत भाजपने शरद लाड यांचं पूनर्वसन केल्याचं म्हटलं जातंय.

त्याचवेळी शिंदेच्या शिवसेनेने आटपाडी तालुक्यातील निंबवडे सर्कलमधून पराभूत झालेल्या अॅड. विद्या सचिन मोटे यांना संधी दिलीय. विशेष म्हणजे, पडळकरांच्या भावजय माधवी पडळकर यांनी मोटेंचा पराभव केला होता. त्याच मोटेंना शिवसेनेनं स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिल्याने येत्या तालुक्यातला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात काय तर, तालुक्यात एकहाती सत्ता मिळवून देणाऱ्या गोपीचंद पडळकरांना जिल्ह्यातलं पक्ष नेतृत्व मात्र सत्तेत वाटा देताना हात आखडता घेताना दिसतंय. गेल्या महिनाभरात दोनदा असं घडलंय. पडळकर समर्थक सांगतात तसं राज्यात फडणवीसांची मर्जी असली, तर स्थानिक पातळीवर मात्र पडळकरांचा मेळ नीट बसताना दिसत नाही. यासाठी पडळकरांचं एककल्ली, स्वतःभोवती केंद्रीत असलेलं नेतृत्व हेही कारणीभूत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.