सूडाग्नीने पेटला! 35 वर्षीय व्यकीची निर्घृण हत्या; 20 वर्षीय तरुणाने रचलेल्या कटाने सगळेच हादरले!
अजमेरमधील एका 20 वर्षीय तरुणाने वडिलांच्या झालेल्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी भयंकर कट रचला आणि एका 35 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलांच्या अपमानाचा सूड
20 वर्षीय तरुणाने रचला भयंकर कट
Crime News : वडिलांचा अपमान झाल्याचा राग मनात धरून एका 20 वर्षीय तरुणाने मित्राच्या मदतीने 35 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राकेश रेगर असे मृत व्यक्तीचे नाव असून अजय कुमार रेगर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी राकेश आणि अजयचे वडील सोहनलाल यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला होता. या वादात वडिलांचा अपमान झाल्याचा राग अजयच्या मनात होता. याच रागातून त्याने आपल्या एका अल्पवयीन मित्रासोबत राकेशच्या हत्येचा कट रचला. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील ही घटना आहे.
कट रचून हत्या
17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राकेश दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला होता. त्यावेळी अजय आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने सोबत नेले. अजमेरमधील सावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टांकावास गावाजवळील निर्जन रस्त्यावर तिघांनी देशी दारू प्यायली. यावेळी आरोपींनी राकेशला जास्त दारू पाजली. तो पूर्णपणे नशेत गेल्यानंतर दुचाकीवरून निघत असताना अजयने गाडीला लाथ मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर अजयने राकेशच्या छातीवर बसून जवळच असलेल्या सुमारे तीन किलो वजनाच्या दगडाने त्याच्या छातीवर, चेहऱ्यावर आणि हनुवटीवर हल्ला केला.
हे ही वाचा : सिराजला वगळल्याने रणकंदन; रवी शास्त्री, गावस्कर भडकले, तर काँग्रेस खासदाराच्या आरोपाने वादाला राजकीय रंग
दगडाने ठेचून संपवले
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी राकेशवर दगडाने तब्बल 15 ते 20 वार केले. गंभीर जखमा आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह आणि दुचाकी घटनास्थळीच सोडून दिली. हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यानंतर दोघेही चालत घरी गेले आणि झोपले. दुसरीकडे राकेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल करत अजयवर संशय व्यक्त केला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता; मात्र फॉरेन्सिक तपासणीत राकेशचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर गंभीर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मोनोरेलसंबंधी मोठी अपडेट समोर, मुंबईकरांची प्रतीक्षा कधी संपणार?
अल्पवयीन मित्राची मदत
त्यानंतर पोलिसांनी अजय कुमार रेगरला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या दाव्यानुसार, चौकशीत अजयने अल्पवयीन मित्राच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अजयला अटक केली असून अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. अजयला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर अल्पवयीन आरोपीची बाल न्यायालयात हजेरी लावल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजस्थान पोलीस करत आहेत.
