सिराजला वगळल्याने रणकंदन; रवी शास्त्री, गावस्कर भडकले, तर काँग्रेस खासदाराच्या आरोपाने वादाला राजकीय रंग
Mohammed Siraj : क्रिकेटमधील मैदानावरील रणनीतीचा हा वाद आता राजकीय आखाड्यात पोहोचला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी एका व्हिडिओद्वारे सिराजला संघाबाहेर ठेवण्यामागे धार्मिक भेदभाव असल्याचा अतिशय गंभीर आरोप केलाय. चांगल्या कामगिरीनंतरही सिराजला संधी मिळत नाही कारण त्याचं नाव 'सिराज' आहे, असा दावा करत गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून असं वारंवार घडत असल्याचं त्यांनी म्हटलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोहम्मद सिराज संघात का नाही?
रवी शास्त्री, कैफ आणि दिग्गजांचा टीम मॅनेजमेंटवर निशाणा
Mohammed Siraj : वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि अवघ्या 70 धावांत यजमान संघाचा निम्मा संघ तंबूत परतला. मात्र, त्यानंतर हेन्री निकोल्स (नाबाद 113) आणि ग्लेन फिलिप्स (नाबाद 94) यांनी सहाव्या गड्यासाठी 173 धावांची अभेद्य भागीदारी रचत पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडला 5 बाद 243 धावांपर्यंत नेलं. दुसऱ्या बाजूने जसप्रीत बुमराहला अपेक्षित साथ न मिळाल्याने मैदानाबाहेर एकच प्रश्न जोर धरू लागला तो म्हणजे वेगवान गोलंदाजांना पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संघात का नाही?
भारतीय क्रिकेटमध्ये एखाद्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला संघात संधी मिळाली नाही, तर त्यावरून वादविवाद होणे हे काही नवीन नाही. मात्र, एखाद्या खेळाडूला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय थेट धार्मिक भेदभावाच्या आरोपांपर्यंत पोहोचतो, तेव्हा हा विषय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने सध्या असाच वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि मोहम्मद कैफ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी सिराजला त्याच्या नावामुळे संघात स्थान मिळालं नसल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला धार्मिक रंग मिळाला आहे.
वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर सिराजची उणीव आणि आकडेवारीचा आरसा
न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने जसप्रीत बुमराह, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा आणि अंशुल कंबोज या 4 वेगवान गोलंदाजांना संधी दिली. तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यात आलं. पहिल्या दिवशी बुमराहने कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद करत एकूण 3 विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज आणि आकाश दीपला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना मात्र पहिल्या दिवसाअखेर एकही विकेट घेता आली नाही.
मोहम्मद सिराजला वगळण्याचा निर्णय अधिकच चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याची अलीकडची कामगिरी. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू सत्रात सिराज 43 बळींसह भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्या मालिकेत त्याने 23 बळी घेत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. विशेषतः ओव्हलवरील ज्या अखेरच्या कसोटीत भारताने अवघ्या 6 धावांनी थरारक विजय मिळवला, त्या सामन्यातही सिराजने दुसऱ्या डावात 5 आणि सामन्यात एकूण 9 विकेट्स काढल्या होत्या. अशा स्थितीत न्यूझीलंडमधील वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर सिराजला बाहेर बसवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे ही वाचा : मुंबई : तरुण-तरुणीला शिवीगाळ, मारहाण; अल्पवयीन मुलांची क्रूरता, व्हिडीओ व्हायरल
रवी शास्त्री, कैफ आणि दिग्गजांचा टीम मॅनेजमेंटवर निशाणा
सिराजला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उघडपणे आश्चर्य व्यक्त करत सिराजला वगळण्याचा निर्णय समजण्यापलीकडचा असल्याचं सांगितलं. संघ निवडीसाठी वेग, कौशल्य आणि चेंडूला सीम मूव्हमेंट मिळवून देण्याची क्षमता हेच निकष असतील, तर सिराजला संधी का मिळाली नाही, असा सवाल शास्त्रींनी उपस्थित केला. अनुभवी गोलंदाज म्हणून सिराजकडे असलेली आक्रमकता आणि सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता यांचाही विचार व्हायला हवा, असंही त्यांनी म्हटलं. शास्त्रींसह सुनील गावस्कर, आर. अश्विन, आकाश चोप्रा आणि हर्षा भोगले यांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही सिराजला वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याच्या मते, एखाद्या खेळाडूच्या एका मालिकेतील खराब कामगिरीवरून त्याच्या संपूर्ण क्षमतेचं मूल्यमापन करणं योग्य नाही. इंग्लंड दौऱ्यात कठीण परिस्थितीतही भारताला विजय मिळवून देणाऱ्या सिराजला परदेशातील कसोटी सामन्यात संधी न देण्याचं कारण काय, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर फिरकीला अधिक मदत मिळत असल्याने श्रीलंका दौऱ्यात सिराजला अपेक्षित विकेट्स मिळाल्या नसतील, मात्र त्यावरून सिराजच्या एकंदरीत कामगिरीबद्दल काही निष्कर्ष काढता येणार नाही, असं कैफचं म्हणणं आहे. "सध्याच्या मॅनेजमेंटचं चाललं, तर 2-3 खराब सामन्यांनंतर ते सचिन तेंडुलकरलाही संघाबाहेर करतील," अशा शब्दांत कैफने संघ व्यवस्थापनाला अक्षरशः झोडपून काढले आहे.
हे ही वाचा : सोलापूर : नातवांच्या वेगळ्या वाटा! गणपतराव देशमुखांच्या नातवांमध्ये राजकीय संघर्ष?
क्रिकेटच्या वादात राजकारणाची एन्ट्री; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
क्रिकेटमधील मैदानावरील रणनीतीचा हा वाद आता राजकीय आखाड्यात पोहोचला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी एका व्हिडिओद्वारे सिराजला संघाबाहेर ठेवण्यामागे धार्मिक भेदभाव असल्याचा अतिशय गंभीर आरोप केलाय. चांगल्या कामगिरीनंतरही सिराजला संधी मिळत नाही कारण त्याचं नाव 'सिराज' आहे, असा दावा करत गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून असं वारंवार घडत असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी सुनील गावस्कर यांनीही सिराजवर अन्याय झाल्याचं म्हटल्याचा दाखला देखील दिला.
मसूद यांच्या या आरोपांना केंद्र सरकार आणि भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी हे आरोप फेटाळून लावत भारतात धर्म किंवा जातीच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला जात नसल्याचं त्यांनी सांगितलंय. देशात संधी केवळ गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते, त्यामुळे जात-धर्माच्या आधारावर फूट पाडण्याची गरज नसल्याचे त्यांनी सुनावले. सहारनपूरमधील भाजप नेते शीतल बिश्नोई यांनीही खेळाला धर्म आणि राजकारणाशी जोडणं चुकीचं असल्याचं सांगत खेळाडूंची निवड ही कामगिरी, तंदुरुस्ती आणि संघाच्या गरजेनुसार होत असल्याचं स्पष्ट केलं.
भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरचे बालपणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनीही सिराजच्या निवडीवरून करण्यात येणारे धार्मिक भेदभावाचे आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या मते, संघात कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, याचा निर्णय घेताना संघाचे संयोजन, खेळाडूची भूमिका आणि त्याची कामगिरी या बाबींचा विचार केला जातो. त्यामुळे सिराजला संघाबाहेर ठेवण्यामागे धार्मिक कारण असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिकेटमध्ये अंतिम संघ निवडीवेळी खेळाडूची सध्याची कामगिरी, फिटनेस, प्रतिस्पर्धी संघ आणि खेळपट्टी अशा अनेक बाबींचा विचार केला जातो. मात्र, एखाद्या अनुभवी आणि प्रभावी खेळाडूला बाहेर ठेवलं जातं, तेव्हा त्या निर्णयामागील कारणं स्पष्ट होणंही तितकंच गरजेचं असतं. मोहम्मद सिराजच्या बाबतीतही नेमका हाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला संधी न देण्यामागे संघ व्यवस्थापनाची नेमकी काय भूमिका होती, याचं स्पष्ट उत्तर मिळाल्याशिवाय या चर्चेला पूर्णविराम मिळणं सध्या तरी कठीण दिसतंय. एकंदरीत, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत महत्त्वाच्या असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात एका संघनिवडीने अनपेक्षित वादळ निर्माण केलं आहे. वेलिंग्टन कसोटीच्या उर्वरित दिवसांत भारतीय गोलंदाजांची कामगिरी कशी होते, यावरूनच टीम मॅनेजमेंटच्या या धाडसी निर्णयाचं खरं मूल्यमापन होऊ शकेल.
