पुणे : मंदार किवळेला जुन्या प्रकरणात जामीन कसा मिळाला होता?

राहुल गायकवाड

• 08:51 AM • 27 Nov 2026

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेला मंदार किवळे हा 2025 मधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी होता. तब्बल दीड वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन कसा मिळाला?

Mandar Kivale Attack

Mandar Kivale Attack

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मंदार किवळे हत्या प्रकरण

point

वीस महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामीन कसा मिळाला?

point

मंदारच्या वकिलांनी काय सांगितलं?

Mandar Kivale Attack : पुण्यातील मंदार किवळे याच्यावर न्यायालयाच्या परिसरातून बाहेर पडताना हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यानंतर मंदार किवळे न्यायालयात नेमका कोणत्या कामासाठी आला होता आणि खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असतानाही त्याला जामीन कसा मिळाला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत मंदारचे वकील अ‍ॅड. रविशंकर ठोंबरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंदारची काल न्यायालयात नियमित तारीख होती. त्याच्या सहआरोपीच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद आणि स्वतःच्या बाजूने म्हणणे मांडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण पुराव्यांसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी मंदार कोर्टात आला होता.

हे वाचलं का?

20 महिने तुरुंगात

मंदार किवळे याच्यावर यापूर्वी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात तो जवळपास 20 महिने तुरुंगात होता. एप्रिल 2025 पासून ते 2026 पर्यंत त्याला कारागृहात राहावे लागले होते. तपासातील त्रुटी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांमधील तफावत या बाबींचा विचार करून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता, अशी माहिती ठोंबरे यांनी दिली. तसेच मंदारची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंबेगावमधील दोन गुंठ्यांच्या जागेच्या वादातून हे प्रकरण सुरू झाले होते. निंबाळकर आणि पवार या दोन व्यक्तींमध्ये जमिनीवरून वाद होता. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थिती आणि सहभाग असल्याचे दाखवल्यामुळे मंदारला या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.

हे ही वाचा : Mumbai NCP Meeting : मुंबईतील एनसीपीच्या बैठकीत काय ठरलं?

सहा तास शस्त्रक्रिया

जामीन मंजूर करताना न्यायालयाने मंदारला काही अटी घातल्या होत्या. आंबेगाव पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याव्यतिरिक्त त्याला पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. या अटींचे तो पालन करत होता. कालही त्याला आंबेगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावायची होती. मात्र, त्यापूर्वीच न्यायालयातून बाहेर पडताना त्याच्यावर हल्ला झाला. त्यावेळी त्याच्यासोबत दोन मित्र आणि एक सहआरोपी होता. मात्र, ते सर्वजण आपापल्या मार्गाने निघून गेल्यानंतर मंदार एकटाच न्यायालयाच्या चौथ्या क्रमांकाच्या गेटमधून बाहेर पडला होता. हल्ल्यात त्याच्या हातांवर गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर जवळपास सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तो शुद्धीवर असून बोलत असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली.

हे ही वाचा : Personal Finance: घर खरेदीसाठी जमा केलेले पैसे SIP मध्ये ठेवणे कितपत योग्य?

'खुनाचा बदला खुनाने घेणे योग्य नाही'

दरम्यान, न्यायालयाच्या परिसरातच अशा प्रकारचा गंभीर हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने पोलिसांकडून तपासासाठी त्यांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचेही समोर आले असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना अ‍ॅड. ठोंबरे यांनी, एखादी व्यक्ती आरोपी असली तरी तिने गुन्हा केला आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असे स्पष्ट केले. तसेच एखाद्याने गुन्हा केला असेल तरी त्याचा बदला खुनाने घेणे योग्य नाही. अशा घटनांमुळे गुन्हेगारीचे चक्र थांबण्याऐवजी आणखी वाढत जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.