मुलाचा विवाहित महिलेसोबत विवाह करण्याचा हट्ट, संतापलेल्या आईने पोटच्या पोराची केली हत्या

सुमित भुजबळ

• 07:44 AM • 27 Nov 2026

Crime News : विवाहित महिलेशी लग्न करण्याच्या निर्णयाला विरोध करत आईनेच 25 वर्षीय मुलाची हत्या केल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही चित्रणामुळे या हत्येचा उलगडा झाला.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुलाचा विवाहित महिलेसोबत विवाह करण्याचा हट्ट

point

संतापलेल्या आईने पोटच्या पोराची केली हत्या

Crime News : विवाहित महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने आईनेच आपल्या 25 वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील जक्केनहळ्ळी येथे हा प्रकार घडला. शिवम्मा असे आरोपी आईचे नाव असून, मुथुराज असे मृत तरुणाचे नाव आहे. लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून तिने मुलाची हत्या केली. मंगळवारी सकाळी मुथुराजचा मृतदेह घराबाहेर आढळून आला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. विशेष म्हणजे, या घटनेची माहिती सर्वप्रथम त्याची आई शिवम्मा हिनेच दिली होती. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर तिने रडण्यास सुरुवात केली. तसेच अज्ञात व्यक्तींनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप तिने केला. मात्र, तिचा हा बनाव पोलिसांच्या तपासात उघड झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : दोघा भावांनी नूडल्स खाल्ले, घरी येताच एकाचा जीव गेला, दुसरा ICU मध्ये दाखल; नेमकं काय घडलं?

आईकडून मुलावर लोखंडी रॉडने हल्ला

सुरुवातीला पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुथुराजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या हत्येचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यास सुरुवात केली. यावेळी एका सीसीटीव्ही चित्रणात मध्यरात्रीच्या सुमारास एक महिला घरातून बाहेर येताना दिसली. या महिलेने घराबाहेर झोपलेल्या मुथुराजवर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्यानंतर ती पुन्हा घरात गेल्याचे चित्रणात दिसून आले. या चित्रणामुळे पोलिसांचा संशय मुथुराजच्या आईवर गेला. त्यानंतर पोलिसांनी शिवम्माची कसून चौकशी केली. सुरुवातीला संशयास्पद वर्तन करणाऱ्या शिवम्माने अखेर मुलावर हल्ला केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : सुप्रिया सुळे बैठक अर्धवट सोडून तात्काळ ब्रीच कँडीकडे रवाना, शरद पवारांना नेमकं झालं तरी काय?

विवाहित महिलेसोबत लग्न करू नये, आईची इच्छा 

पोलिसांच्या माहितीनुसार, मुथुराजचा आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय शिवम्माला मान्य नव्हता. तो दुसऱ्या जातीतील एका विवाहित महिलेशी लग्न करण्याच्या विचारात होता. संबंधित महिलेला दोन मुले आहेत. मुलाने अशा महिलेशी लग्न करू नये, अशी शिवम्माची इच्छा होती. याच कारणावरून आई आणि मुलामध्ये वाद असल्याचे तपासात समोर आले आहे. मुथुराज बंगळुरूमधील एका कारखान्यात काम करत होता. मात्र, त्याच्या विवाहाच्या निर्णयामुळे आई नाराज होती. मुलाने आपला निर्णय बदलावा, यासाठी शिवम्माने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुथुराज आपल्या निर्णयावर ठाम असल्याने शिवम्माचा राग वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवम्माने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, मुलाची हत्या करण्याचा तिचा सुरुवातीला हेतू नव्हता. त्याला केवळ धडा शिकवायचा होता, असा तिचा दावा आहे. मात्र, मध्यरात्री मुलगा घराबाहेर झोपलेला असताना तिने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुथुराज गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शिवम्मा घरात परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा मृतदेह पाहून तिने अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याचा बनाव केला. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही चित्रणामुळे संपूर्ण प्रकार उघड झाला. विवाहित महिलेशी लग्न करण्याच्या मुलाच्या निर्णयाला विरोध करत आईनेच त्याची हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.