Crime News: बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील खामगाव शहरातील हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसी आणि प्रियकर दोघांचे मृतदेह आढळले. हॉटेलचा वेटर त्या जोडप्याच्या खोलीत गेला असता त्याने हे सगळं पाहिलं. त्यावेळी, वेटरने याबद्दल तातडीने हॉटेलच्या मालकाला माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. काही काळानंतर, संपूर्ण शहरात ही बातमी पसरली आणि लोक मोठ्या संख्येने हॉटेलच्या बाहेर गोळा झाले.
ADVERTISEMENT
8 वेळा याच हॉटेलमध्ये भेटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुतुजा (21) आणि साहिल राजपूत (23) अशी प्रकरणातील मृतांची नावे समोर आली आहेत. दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील साखर खेरडा गावाचे रहिवासी असल्याची माहिती आहे. खरंतर, रुतुजा ही खामगाव पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये 'कंप्यूटर सायन्स'ची विद्यार्थीनी असून ती मागील दोन वर्षांपासून साहिलसोबत प्रेमसंबंधात होती. दोघे नेहमी याच हॉटेलमध्ये भेटायचे, तसेच मागील वर्षभरात ते दोघे जवळपास 8 वेळा याच हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आले होते.
हे ही वाचा: गरोदर पत्नीसोबत पतीने केलं निर्घृण कृत्य! आधी बेदम मारहाण अन् नंतर गळा चिरून... अखेर छतावरून मारली उडी
प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय
प्राथमिक माहितीनुसार, साहिलला आपल्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून, हॉटेलच्या खोलीत दोघांमध्ये मोठं भांडण झालं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, साहिलने आधीच हत्येचं प्लॅनिंग बनवलं असून तो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी येताना धारदार शस्त्र घेऊन आला होता. सुरूवातीला दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद टोकाला पोहचला. रागाच्या भरात साहिलने त्याची प्रेयसी रुतुजावर हल्ला केला आणि त्यात रुतुजाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, आरोपी प्रियकराने स्वत: वर हल्ला करून आत्महत्या केली.
हे ही वाचा: VIDEO : धैर्यशील मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची गाडी थांबवली, सोलापुरात नेमकं काय घडलं?
पोलिसांचा तपास
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी निलेश तांबे घटनास्थळी पोहचले आणि तिथला तपास केला. पोलिसांनी हॉटेलच्या खोल्या सील केल्या असून मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, हॉटेलच्या बाहेर पार्किंग मध्ये असलेली साहिलची बाईक सुद्धा जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमकडून सुद्धा मदत घेतली जात आहे.
ADVERTISEMENT
