Crime News : एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीच्या 16 वर्षीय प्रियकरानेच हे संतापजनक कृत्य केले. आरोपीने आधी प्रेयसीवर बलात्कार केला आणि नंतर आपले बिंग फुटेल या भीतीने तिची हत्या करुन मृतदेह दोरी बांधून झाडाला लटकवला. करण विश्वास असं या अल्पवयीन आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतले आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 6 महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेली तरुणी घरी परतली; पण मध्यरात्री झाडाखाली आढळले दोघांचे मृतदेह...
दहा मिनिटांत वॉशरूमला जाऊन येते आणि चहा बनवते
घटनेच्या दिवशी पीडितेच्या वडिलांनी तिला चहा बनवण्यास सांगितले होते, तेव्हा तिने 'दहा मिनिटांत वॉशरूमला जाऊन येते आणि चहा बनवते' असे सांगितले. मात्र अर्धा तास उलटूनही ती परतली नाही, तेव्हा कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशय आल्याने घरातील मोबाईल तपासला असता, तिला करणचा फोन आल्याचे समजले. गावकऱ्यांनी आरोपीच्या घरी जाऊन दबाव टाकल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या बांबूच्या झाडांमध्ये पीडितेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने पीडितेवर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची गळा दाबून हत्या केली. हा गुन्हा आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी त्याने मृतदेह झाडाला लटकवून टाकला. पीडितेच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि गळ्यावर काळे डाग आढळले आहेत. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. ही गळा दाबून केलेली हत्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
खासदार पप्पू यादव यांची कुटुंबाला भेट
या अमानुष घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून पीडित कुटुंबाची भेट घेतली. दोषीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी आणि कुटुंबाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सध्या पीडितेचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











