सावधान! बाथरुमपासून बेडरुमपर्यंत तुम्हाला कोणीतरी बघतंय, मेटाच्या स्मार्ट ग्लासेसबाबत धक्कादायक माहिती समोर

Meta Smart Glasses : एआय आणि स्मार्ट ग्लासेसच्या बाबतीत जगात वेगाने बदल होत आहेत. मेटाच्या 'रे-बॅन' स्मार्ट ग्लासेसना पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान मानले जात आहे. मात्र, आता याच ग्लासेसबाबत एक नवीन अहवाल समोर आला असून, त्याने प्रायव्हसीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका वृत्तपत्राने केलेल्या तपासात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेटाच्या एआयला प्रशिक्षित करण्यासाठी मेटाच्या 'रे बॅन' या स्मार्ट ग्लासेसचा वापर करुन लोकांचे खाजगी व्हिडिओ शूट करण्यात येत आहेत. या तपासात नक्की काय माहिती समोर आली आहे, जाणून घेऊया.

Meta Smart Glasses

Meta Smart Glasses

मुंबई तक

06 Mar 2026 (अपडेटेड: 06 Mar 2026, 12:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सावधान! बाथरुमपासून बेडरुमपर्यंत तुम्हाला कोणीतरी बघतंय

point

मेटाच्या स्मार्ट ग्लासेसबाबत धक्कादायक माहिती समोर

Meta Smart Glasses : एआय (AI) आणि स्मार्ट ग्लासेसच्या बाबतीत जगात वेगाने बदल होत आहेत. मेटाच्या 'रे-बॅन' (Ray-Ban) स्मार्ट ग्लासेसना पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान (Next-Gen Technology) मानले जात आहे. मात्र, आता याच ग्लासेसबाबत एक नवीन अहवाल समोर आला असून, त्याने गोपनीयतेच्या (Privacy) बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका वृत्तपत्राने केलेल्या तपासात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेटाच्या एआयला प्रशिक्षित करण्यासाठी मेटाच्या रेबॅन या स्मार्ट ग्लासेसचा वापर करुन लोकांचे खाजगी व्हिडिओ शूट करण्यात येत आहेत. या तपासात नक्की काय माहिती समोर आली आहे, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : टीम इंडियाचे 'हे' खरे दोन 'हिरे', पराभव रोखला अन् इंग्लंडला भारत सोडायला पाडलं भाग!

तुमच्या खाजगी क्षणांचं रेकॉर्डिंग होतंय

या अहवालानुसार, मेटा-रेबॅन स्मार्ट ग्लासेसद्वारे रेकॉर्ड होणाऱ्या काही व्हिडिओ क्लिप्स प्रत्यक्ष माणसे बसून पाहत आहेत. म्हणजेच, जे लोक हे स्मार्ट ग्लासेस वापरत आहेत, ते स्वतः नकळत एका देखरेखीचा भाग बनू शकतात. 27 फेब्रुवारी रोजी स्वीडनमधील 'Svenska Dagbladet' या वृत्तपत्राने केलेल्या एका तसापात मेटा आणि रे-बॅन यांची भागीदारी आणि त्यांच्या एआय ग्लासेसच्या कामकाजाच्या पद्धतीची पाहणी केली. या चौकशीत असे समोर आले की, या ग्लासेसद्वारे रेकॉर्ड केलेले फुटेज अनेक लोकांपर्यंत पोहोचते, ज्यात एआयला प्रशिक्षित करणाऱ्या 'ह्युमन ट्रेनर्स'चा समावेश आहे.

केनियाच्या नैरोबी येथील एका कंपनीशी संबंधित काही अनामिक सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, त्यांनी असे व्हिडिओ पाहिले आहेत. या व्हिडिओंमध्ये लोक त्यांच्या अत्यंत खाजगी आणि संवेदनशील परिस्थितीत दिसत आहेत. अहवालात अशा व्हिडिओंचा उल्लेख आहे जिथे कपडे बदलताना किंवा जोडीदारासोबतचे खाजगी क्षण रेकॉर्ड झाले आहेत आणि मेटाच्या ट्रेनिंगच्या नावाखाली ह्युमन मॉडरेटर्स ते पाहत आहेत. हे असे क्षण आहेत ज्यात मेटा स्मार्ट ग्लास वापरणाऱ्या वापरकर्त्याला कॅमेरा चालू असावा असे कदाचित अजिबात वाटणार नाही.

केनियातील कंपनी पुरवते कर्मचारी

या अहवालानुसार, 'Sama' नावाची कंपनी मेटाची केनियातील सब-कॉन्ट्रॅक्टर असून ती असे कर्मचारी पुरवते. हे कर्मचारी फोटो आणि व्हिडिओंमधील गोष्टी ओळखून मेटाच्या एआयला प्रशिक्षित करतात. हजारो लोक स्क्रीनवर बॉक्सेस बनवून वेगवेगळ्या वस्तू ओळखतात. हा डेटा नंतर एआय सिस्टमला दिला जातो जेणेकरून त्याचे मॉडेल्स अधिक प्रगत होतील. एका कर्मचाऱ्याने अहवालात सांगितले की, त्याने असे व्हिडिओ पाहिले ज्यात लोक बाथरूममध्ये जात होते किंवा कपडे उतरवत होते. मात्र, व्हिडिओत कैद झालेल्या लोकांना हे रेकॉर्ड होत असल्याचे माहित होते की नाही, हे आपल्याला ठाऊक नसल्याचेही त्याने सांगितले.

पण हे स्पष्ट आहे की, त्यांचे हे फुटेज इतर कुठेही पाहिले जावे असे त्यांना नक्कीच वाटणार नाही. इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, त्याने एक व्हिडिओ पाहिला ज्यात एका व्यक्तीने आपले स्मार्ट ग्लास बेडसाईड कॅबिनेटवर ठेवले आणि तो खोलीबाहेर गेला, त्यानंतर काही वेळाने एक महिला खोलीत आली आणि कपडे बदलू लागली.

डेटा अॅनोटेर्ट्सना दाखवण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये क्रेडिट कार्डची माहिती आणि लैंगिक हालचालींचे फुटेज देखील समाविष्ट होते. काही व्हिडिओ कदाचित वापरकर्त्याने जाणूनबुजून रेकॉर्ड केले असावेत, परंतु अनेक प्रकरणांमध्ये ही रेकॉर्डिंग पूर्ण माहिती किंवा संमतीशिवाय झाल्याचे मानले जात आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत रेकॉर्ड झालेले फुटेज जर लीक झाले तर ते अत्यंत लज्जास्पद आणि धोकादायक ठरू शकते.

हे ही वाचा : T-20 World Cup: मॅच इंडिया-इंग्लंडची अन् Video व्हायरल झाला धोनी आणि त्याच्या बायकोचा, अरे नेमकं झालं तरी काय?

मेटाचे रे-बॅन ग्लासेस नेमके कसे आहेत?

मेटाने रे-बॅनसोबत मिळून हे स्मार्ट ग्लासेस तयार केले आहेत. दिसायला हे सामान्य सनग्लासेससारखे वाटतात, परंतु यांच्या आत छोटे कॅमेरे, मायक्रोफोन आणि स्पीकर्स बसवलेले आहेत. वापरकर्ता या ग्लासेसच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो, लाईव्ह स्ट्रीम करू शकतो आणि व्हॉइस कमांडद्वारे एआय असिस्टंटला प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ, एखादा वापरकर्ता शहरात फिरत असेल, तर तो ग्लासने फोटो काढून विचारू शकतो की 'ही इमारत कोणती आहे?'. एआय त्याला त्वरित माहिती देऊ शकते. याच कारणामुळे मेटा आणि इतर टेक कंपन्या स्मार्ट ग्लासला भविष्यातील मोठे व्यासपीठ मानत आहेत.

मात्र समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा हा कॅमेरा सतत चेहऱ्यावर असतो. रेकॉर्डिंग कधी सुरू आहे, हे आजूबाजूच्या लोकांना कळतही नाही. स्मार्टफोनने रेकॉर्डिंग होत असेल तर आसपासच्या लोकांना त्याचा अंदाज येतो कारण फोन हातात असतो. मात्र, स्मार्ट ग्लासमध्ये कॅमेरा फ्रेमच्या कोपऱ्यात लपलेला असतो, त्यामुळे अनेकदा समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ रेकॉर्ड होत असल्याचे समजत नाही.

मेटाने यात एक छोटी LED लाईट दिली आहे, जी रेकॉर्डिंगच्या वेळी लागते. कंपनीचे म्हणणे आहे की ही लोकांना सावध करण्यासाठी आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, गर्दीत किंवा उजेडात ही लाईट सहज लक्षात येत नाही. म्हणजेच अनेक वेळा लोक नकळत रेकॉर्ड होऊ शकतात.

आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टमला प्रशिक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटाची (फोटो, व्हिडिओ, आवाज, मजकूर) गरज आहे. जितका जास्त डेटा असेल, तितके एआय अधिक चांगल्या प्रकारे काम करेल. याच कारणास्तव टेक कंपन्या विविध स्रोतांकडून डेटा गोळा करतात. मेटाचे स्मार्ट ग्लासेस देखील याच इकोसिस्टमचा भाग बनू शकतात, कारण हे ग्लासेस दैनंदिन जीवनातील क्षण - रस्ते, घरे, दुकाने, लोक - रेकॉर्ड करतात. म्हणजेच, हे एक प्रकारे रिअल-वर्ल्ड डेटाचा सतत चालणारा स्रोत ठरू शकतात.

मेटाची भूमिका काय?

मेटाचे म्हणणे आहे की कंपनी गोपनीयतेबाबत गंभीर आहे. वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्याचा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय, रेकॉर्डिंगच्या वेळी LED लाईट लागते जेणेकरून लोकांना कळावे, असेही कंपनी सांगते. मात्र, गोपनीयता समर्थकांचे (Privacy Advocates) म्हणणे आहे की हे पुरेसे नाही, कारण समस्या केवळ रेकॉर्डिंगची नसून त्या डेटाच्या वापराची देखील आहे. नवीन तंत्रज्ञान अनेकदा कायद्यापेक्षा वेगाने धावते आणि स्मार्ट ग्लासेस हे त्याचेच एक उदाहरण आहे. भारत आणि इतर अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे कायदेशीर आहे, परंतु जेव्हा कॅमेरा कोणाच्या चेहऱ्यावर असतो आणि तो कधीही चालू होऊ शकतो, तेव्हा परिस्थिती वेगळी असते. या प्रकारच्या उपकरणांसाठी कायदे अजून पूर्णपणे तयार झालेले नाहीत.

जगाचे पाळत ठेवणाऱ्या नेटवर्कमध्ये रुपांतर?

टेक कंपन्या स्मार्ट ग्लासला पुढील मोठे 'कंप्युटिंग प्लॅटफॉर्म' म्हणून पाहत आहेत. ज्याप्रमाणे स्मार्टफोनने जग बदलले, त्याचप्रमाणे भविष्यात स्मार्ट ग्लासेस दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनू शकतात. पण त्यासोबत एक मोठा प्रश्नही जोडला गेला आहे – जर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर कॅमेरा असेल, तर जग एका मोठ्या पाळत ठेवणाऱ्या नेटवर्कमध्ये (Surveillance Network) रूपांतरित होईल का? आणि कदाचित हेच ते प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर सध्या कोणाकडेही नाही.

    follow whatsapp