बारामती, राहुरीचा Exit Poll; 'रुद्र रिसर्च'ने थेट आकडेच सांगितले.. पाहा कोणाचा किती मतांनी होणार विजय

Baramati Exit Poll: राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या एकतर्फी विजयाची शक्यता आहे असा Exit Poll चा अंदाज 'रुद्र रिसर्च' व्यक्त केला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:50 PM • 29 Apr 2026

follow google news

पुणे: राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक झाली. राहुरीमध्ये एकूण 56.20% तर बारामतीमध्ये 58.17% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामती मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघातील जागा रिक्त होती. 

हे वाचलं का?

भाजपकडून राहुरी मतदारसंघासाठी दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले तर बारामती मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या. राहुरीमध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक Exit Poll

बारामतीमध्ये कुठल्याच मोठ्या पक्षाने उमेदवार दिला नव्हता. रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स' या संस्थेने राहुरी आणि बारामती मतदारसंघात ग्राउंडवर जाऊन मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार राहुरीमध्ये भाजप तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा>> मतदानानंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, दादांच्या आठवणीने कंठ दाटला; नेमकं काय म्हणाल्या?

राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह इतर तीन अपक्ष असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व इतर 22 असे एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

अक्षय कर्डिले यांचा तब्बल 1,17,000 मतांनी होऊ शकतो विजय, रुद्र रिसर्चचा दावा

'रुद्र रिसर्च'च्या अंदाजानुसार राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा आपला गड राखणार असल्याचे दिसून येते. अंदाजानुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना 142500 (76%), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 25500 ( 14%) तर इतरांना 19463 (10%) मतदान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा तब्बल 117000 (62%) इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयाची शक्यता असल्याचे दिसून येते.

हे ही वाचा>> "2029 मध्ये बारामतीतून मी निवडणूक लढावी, अशी लोकांची इच्छा आहे..पण" ; जय पवार यांचं मोठं वक्तव्य

अक्षय कर्डिले यांच्यासोबत स्व. शिवाजी कर्डिले यांची असणारी सहानुभूती, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची निवडणुकीतून मागार व कार्यकर्त्यांचा भाजपच्या बाजूने असलेला कल, विरोधात तुल्यबळ उमेदवार नसणे, विखे पाटील कुटुंबीयांचा असणारा पाठिंबा, आमदार संग्राम जगताप यांचे नियोजन व अहिल्यानगर तालुक्यातील प्रभाव, आमदार मोनिका राजळे यांनी केलेला प्रचार आणि पाथर्डी तालुक्यातील प्रभाव, अक्षय कर्डिले यांनी गावोगावी केलेला प्रचार, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरेंमुळे होणारे मतांचे विभाजन, महाविकास आघाडीला वातावरण निर्मिती करण्यात आलेल्या मर्यादा या कारणांमुळे अक्षय कर्डिले यांच्या विजयाची एकतर्फी शक्यता आहे.

सुनेत्रा पवार यांचा 2,07,000 इतक्या मताधिक्याने होऊ शकतो विजय, रुद्र रिसर्चचा Exit Poll

'रुद्र रिसर्च'च्या अंदाजानुसार, बारामती मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 212000 (95%) तर इतरांना 11705 (5%) मते मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांचा 207000 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय होण्याची शक्यता आहे.

बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचा असलेला प्रभाव आणि प्रमुख सदस्यांनी मतदारांमध्ये जाऊन केलेला प्रचार, स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे नागरिकांमध्ये असणारी सहानुभूतीची मोठी लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा, कोणत्याही प्रमुख पक्षाने विरोधात न दिलेला उमेदवार, सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरीक्त असणाऱ्या उमेदवारांचा मर्यादित प्रभाव यामुळे सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज आहे.

राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर प्रमुख उमेदवारांनी मागार घेतली. याचा फायदा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना होत असल्याचे दिसून येते.