जळगाव: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करणारे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. रामदास कदम यांच्याकडे अजित पवारांच्या घातपाताबाबत काही पुरावे किंवा ठोस माहिती असेल, तर त्यांनी सर्वप्रथम आपले पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी भूमिका अनिल पाटील यांनी मांडली आहे. तसेच संबंधित पुरावे तपास यंत्रणांकडे सादर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
'पुरावे असतील तर आधी योगेश कदमांचा राजीनामा घ्या'
रामदास कदम यांनी अजित पवारांच्या घातपाताबाबत काही माहिती किंवा पुरावे असल्याचा दावा केला असेल, तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे अनिल पाटील यांनी म्हटले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे रामदास कदम यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात पुरावे असतील आणि ते अद्याप सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांपर्यंत पोहोचले नसतील, तर ही गंभीर बाब आहे.
हे ही वाचा>> 'अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरेंचा हात?', रामदास कदमांनी उडवून दिली खळबळ
पुढे बोलताना अनिल पाटील म्हणाले, "रामदास कदम यांच्याकडे एवढी माहिती होती किंवा संशय होता किंवा तटकरे यांचा घातपातामध्ये हात आहे, असा पुरावा त्यांच्याकडे असेल, तर योगेश कदम हे त्यांच्याच घरामध्ये गृहराज्यमंत्री आहेत. जर गृहराज्यमंत्र्यांच्याच घरामध्ये पुरावे असतील आणि ते आतापर्यंत सीबीआय किंवा कुठल्या यंत्रणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मदत केली नसेल, तर पहिले योगेश कदम यांचाच राजीनामा घेतला पाहिजे."
'कर्तव्यात कसूर आणि गोपनीयतेचा भंग झाला'
अनिल पाटील यांनी यावेळी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत रामदास कदम यांनी पुरावे तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असेही म्हटले. "पुरावे रामदास कदम यांच्याकडे असतील आणि ते यंत्रणांपर्यंत पोहोचू दिले नसतील, तर माझी मागणी आहे की रामदास कदम यांनी आधी आपल्या मुलाचा राजीनामा दिला पाहिजे. योगेश कदम यांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही," असे अनिल पाटील म्हणाले.
हे ही वाचा>> 'सर्व घडामोडींवर पवार साहेब लक्ष ठेवून, क्षणाक्षणाची अपडेट...', सुप्रिया सुळेंनी थेट व्हिडिओच केला शेअर
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा केवळ माध्यमांमध्येच!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही अनिल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. विलीनीकरणाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असून, आमच्या पक्षातील आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त निराधार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पार्थ पवारांची भेट प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी
पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याच्या वृत्तावरही अनिल पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पक्षातील आमदार भेट घेऊ शकतात. मात्र, या भेटीचा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात आमच्या पक्षातील आमदारांना कोणतेही निरोप देण्यात आलेले नाहीत, असेही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एका बाजूला अजित पवारांच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेलाही अनिल पाटील यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT












