5 मिनिटांत बंटी पाटलांकडून सारे हिशोब चुकते! चंद्रकांत पाटलांना थेट चॅलेंज

सुमित भुजबळ

11 Nov 2026 (अपडेटेड: 11 Nov 2026, 09:27 AM)

Satej Patil on Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या धमकीवजा इशाऱ्याला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊ नका, मी पण पाटील आहे, असं सतेज पाटलांनी म्हटलंय.

Satej Patil on Chandrakant Patil

Satej Patil on Chandrakant Patil

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

5 मिनिटांत बंटी पाटलांकडून सारे हिशोब चुकते!

point

चंद्रकांत पाटलांना थेट चॅलेंज

कोल्हापूर : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल," असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "उद्ध्वस्त करतो, संपवतो, बघून घेतो, अशी भाषा माझ्यापुढे चालणार नाही. मला बोलायला लावू नका. मी सुद्धा पाटील आहे. सरकारी यंत्रणेचा वापर करून मला धमक्या देऊ नका," अशा शब्दांत सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी 2029 च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत एकमेकांविरोधात लढण्याचे खुले आव्हान दिले. "तुम्हाला लढायचे असेल तर कार्यकर्त्यांच्या जीवावर लढूया. लोकशाहीमध्ये ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणे म्हणजे लढणे असते. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून ब्लॅकमेल करण्याची भाषा करू नका," असेही ते म्हणाले.

हे वाचलं का?

हेही वाचा : गिरगाव चौपाटीवरील छठ पुजेबाबत हायकोर्टाचा मोठा निकाल, पाहा कोर्ट काय म्हणालं

काचेच्या घरात राहून दुसऱ्यांना धमक्या देऊ नका - सतेज पाटील 

चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर टीका करताना सतेज पाटील यांनी स्वर्गीय डी. वाय. पाटील यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला. डी. वाय. पाटील यांचा अपमान करण्याचा प्रयत्न कितपत योग्य होता, याचे चिंतन चंद्रकांत पाटील यांनी करावे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला. "मी याआधीच्या पत्रकार परिषदेतही दोघांची नावे घेतली होती. आता अंगावर आल्यावर मुख्यमंत्र्यांना या लढाईत ओढण्याचे काम केले जात आहे," असे सतेज पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना उद्देशून त्यांनी काचेच्या घरात राहून दुसऱ्यांना धमक्या देऊ नका, असा टोला लगावला. चंद्रकांत पाटील यांची वैचारिक पातळी खालावत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा : Personal Finance: जुन्या गाड्यांमध्येही दडलाय पैशांचा खजिना! गुंतवणुकीची संधी

कोल्हापूरची विधानपरिषदेची जागा बिनविरोध कशी झाली? बंटी पाटलांनी सांगितलं 

या पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी गोकुळच्या राजकारणावरून आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानांनाही उत्तर दिले. मुश्रीफ यांनी आपल्यामुळे विधानपरिषदेवर निवडून आल्याचे सांगितल्याचा उल्लेख करताना त्यांनी 2014 मधील राजकीय मदतीची आठवण करून दिली. त्यावेळी आपण मदत केली नसती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराची काय अवस्था झाली असती, याचे उत्तर मुश्रीफ यांनी द्यावे, असे ते म्हणाले. 2020 ते 2022 या काळात विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली. धुळ्यात अमरीश पटेल आणि मुंबईतील निवडणूक काँग्रेसने बिनविरोध करून दिली होती. त्याबदल्यात कोल्हापूरची निवडणूक भाजपने बिनविरोध करून द्यावी, अशी चर्चा झाली होती. त्यानुसार निवडणुका बिनविरोध झाल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोकुळमधील राजकीय संघर्ष आणि सत्तेच्या वापरावरूनही सतेज पाटील यांनी गंभीर आरोप केले. आमच्या विरोधात निकाल लागला तर 13 जणांना घरी घालू, असे विधान केल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या जाणाऱ्या धमक्यांवर प्रश्न उपस्थित केला. "बंटी पाटलांची कालची सभा ही शेवटची सभा आहे," असे प्रशासकांना सांगितले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्तेचा उन्माद नेमका कोणाचा आहे, हे या विधानांमधून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. राज्यात अध्यादेशाच्या माध्यमातून निर्णय घेण्याच्या पद्धतीलाही त्यांनी विरोध दर्शवला. या विरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आहे. अध्यादेशाच्या माध्यमातून सुरू असलेली प्रक्रिया चुकीची असून, याविरोधातील न्यायालयीन लढाईत यश मिळेल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.