'... अश्रू तरळले!', पवारांविषयी सोनिया गांधींनी पुस्तकात काय लिहिलंय?

अनुजा धाक्रस

• 10:23 AM • 11 Nov 2026

Sonia Gandhi belonging book : सोनिया गांधी यांच्या 'Belonging' पुस्तकातून शरद पवार आणि परदेशी मूळाच्या वादाबाबत त्यांची बाजू समोर आली आहे. 1999 मधील काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा त्यांनी केला आहे.

Sonia Gandhi belonging book

Sonia Gandhi belonging book

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'... अश्रू तरळले!', पवारांविषयी सोनिया गांधींनी पुस्तकात काय लिहिलंय?

point

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा

Sonia Gandhi belonging book : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 'Belonging' या पुस्तकातून शरद पवार आणि त्यांच्या परदेशी मूळावरून झालेल्या वादाबाबत त्यांची बाजू समोर आली आहे. 1999 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं, याचा उल्लेख सोनिया गांधींनी पुस्तकात केला आहे. या वादामुळे आपल्याला अश्रू अनावर झाले होते आणि आपण बैठकीतून बाहेर पडलो होतो, असं त्यांनी लिहिलं आहे.

हे वाचलं का?

सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकाच्या 397 व्या पानावर 1999 मधील या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडल्यानंतर काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू होते. अशा परिस्थितीत मे 1999 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीतील तीन सहकाऱ्यांनी आपल्याला एक सविस्तर पत्र पाठवलं होतं, असं सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे. या पत्रात त्यांच्या परदेशी मूळाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यांच्या मते, परदेशी मूळ असल्यामुळे सोनिया गांधी यांनी भारतातील कोणतंही उच्च पद भूषवू नये, असं या पत्रात म्हटलं होतं. सोनिया गांधी यांनी या तीन सहकाऱ्यांची नावं पुस्तकात स्पष्टपणे नमूद केलेली नाहीत. मात्र, या संदर्भात शरद पवारांचा उल्लेख करताना त्यांनी त्यांना केवळ 'महाराष्ट्राचे नेते' असं संबोधलं आहे.

हेही वाचा : Personal Finance: जुन्या गाड्यांमध्येही दडलाय पैशांचा खजिना! गुंतवणुकीची संधी

भारताप्रती असलेल्या आपल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे दुःख झालं - सोनिया गांधी 

या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही हा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आपल्याला अश्रू अनावर झाले आणि आपण बैठकीतून बाहेर पडलो, असं सोनिया गांधी यांनी लिहिलं आहे. राजकारणात येण्यामागे कोणतंही पद मिळवणं किंवा सत्ता मिळवणं हा आपला उद्देश नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या सहकाऱ्यांनी आपल्याला राजकारणात येण्यासाठी आग्रह केला, तेच आता आपल्या विरोधात भूमिका घेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारत हा आपला देश असून, शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय म्हणूनच राहण्याची आपली इच्छा आहे, असंही सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटलं आहे. आपल्या परदेशी मूळावरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांमुळे पद मिळण्याबाबत आपण दुखावले गेलो नव्हतो, तर भारताप्रती असलेल्या आपल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे दुःख झालं होतं, असं त्यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात याच राजकीय घडामोडींचा वेगळा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मते, 1998 मध्ये वाजपेयी सरकार पडल्यानंतर सोनिया गांधी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, मुलायमसिंह यादव यांनी जन्माने परदेशी असलेल्या व्यक्तीला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार नसल्याची भूमिका घेतली होती. या संपूर्ण घडामोडींमागे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण असल्याचं शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. अर्जुन सिंह यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे हा घटनाक्रम घडल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात पुढे शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्याचा आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले आणि निकालानंतर पुन्हा एकत्र आले, असंही त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे एकाच राजकीय घटनेबाबत दोन्ही नेत्यांची वेगवेगळी मांडणी त्यांच्या पुस्तकांतून समोर आली आहे.