Pune : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत चार संचालकांची नेमणूक करून महायुतीने आपला अध्यक्ष बसवला असला, तरी या प्रक्रियेवर आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपण महायुतीत असलो तरी जे काही सुरू आहे ते लोकशाहीला अत्यंत घातक असून, याचा शेवट वाईट असेल असा थेट इशारा धंगेकर यांनी दिला आहे. ही मुद्द्याची लढाई आता गुद्द्यावर येताना दिसत असून, सत्तेचा मीपणा वाढल्यामुळेच विरोधातील नेत्यांना आणि त्यांच्या संस्थांना उद्ध्वस्त करण्याची भाषा वापरली जात असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. ते मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : परिचारकांच्या एन्ट्रीने सोलापूर बँकेच्या निवडणुकीत गेम पलटणार!
सरकारने सहकार कायद्याच्या मूळ ढाचा मोडला - रवींद्र धंगेकर
गोकुळमधील चार तज्ज्ञ संचालकांच्या नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना धंगेकर यांनी सरकारच्या हेतूवर टीका केली. नेमण्यात आलेल्या चार संचालकांपैकी कोणी वकील, कोणी सीए, तर कोणी स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत; या लोकांचा म्हशीच्या दुधाच्या व्यवसायाशी किंवा शेतीशी काहीही संबंध नाही. केवळ हात वर करून मतदान करण्यासाठीच त्यांची नेमणूक करण्यात आली असून, सहकार कायद्याच्या मूळ ढाच्याला मोडून काढण्याचे काम सरकारने केले आहे. कोरम पूर्ण होत नसल्यास त्यासाठी सहकाराचे स्वतंत्र कायदे आणि निवडणूक आयोगाचे अधिकार अस्तित्वात असताना सरकारने केलेला हा हस्तक्षेप चुकीचा असल्याचे मत त्यांनी मांडले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कुटुंब चालवणारी ही सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चंद्रकांत पाटलांनी स्वतःच्या आयुष्यात अंगणवाडी तरी काढली आहे का?
दिवंगत डी. वाय. पाटील यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना धंगेकर यांनी पाटील कुटुंबाच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची आठवण करून दिली. डी. वाय. पाटील यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा असून, त्यांनी अनेक संस्था उभारून स्वत:चे वेगळे जग निर्माण केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या आयुष्यात साधी अंगणवाडी तरी काढली आहे का, असा सवाल करत धंगेकर यांनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली. पुण्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात कमळाच्या चिन्हावर निवडून आल्यामुळेच हे शक्य झाले असून, स्वतःच्या गावात ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले. राजकारणात सत्ता ही येत जात असते, मात्र सत्तेच्या जोरावर कोणाचे कुटुंब किंवा संस्था उद्ध्वस्त करण्याची भाषा करणे ही हुकूमशाही असल्याचे धंगेकर म्हणाले.
आपली ही भूमिका पक्षाची नसून एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि लोकशाहीचा हितचिंतक म्हणून वैयक्तिक असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले. आपण कोणाचेही प्रवक्ते नसलो तरी समाजासाठी काम करणाऱ्या नेतृत्वावर चुकीच्या पद्धतीने टीका होत असेल तर त्याविरोधात बोलणे आपले कर्तव्य आहे. भाजपच्या या कार्यपद्धतीमुळे त्यांचा मूळ कार्यकर्ताही दबला गेला असून अन्याय सहन करत असल्याचे धंगेकर म्हणाले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करू नका आणि लोकशाही वाचवा, असा सल्ला देत वेळ आल्यावर जनता या सर्व गोष्टींचा हिशोब नक्की घेईल, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.
ADVERTISEMENT












