परिचारकांच्या एन्ट्रीने सोलापूर बँकेच्या निवडणुकीत गेम पलटणार!
Solapur district bank election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांची उमेदवारी वैध ठरली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
परिचारकांच्या एन्ट्रीने सोलापूर बँकेच्या निवडणुकीत गेम पलटणार!
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत परिचारकांचे नाव आघाडीवर
Solapur district bank election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांची उमेदवारी वैध ठरली आहे. विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी अपात्र ठरवण्यात आलेल्या आठ उमेदवारांच्या अपिलांवर निर्णय दिला. यामध्ये प्रशांत परिचारक यांचे अपील मंजूर करण्यात आल्याने त्यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, दिलीप माने, संजय मामा शिंदे, जयवंतराव जगताप, सुरेश हसापुरे, सिद्धाराम म्हेत्रे आणि बबनराव अवताडे यांचे अपील फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रशांत परिचारक यांचे नाव आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कलम 88 अंतर्गत झालेल्या कारवाईचा मुद्दा महत्त्वाचा
प्रशांत परिचारक यांची उमेदवारी वैध ठरण्यामागे सहकार कायद्याच्या कलम 88 अंतर्गत झालेल्या कारवाईचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान अपात्र ठरवण्यात आलेल्या आठ जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. या अपिलांवर 6 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. परिचारक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात दोन स्वतंत्र अपिले दाखल केली होती. या अपिलांसोबत त्यांनी रिझर्व्ह बँकेने 29 मे 2018 रोजी जिल्हा बँकेचे संचालक बरखास्त करण्याचा निर्णय घेण्याच्या 15 दिवस आधी, म्हणजेच 14 मे 2018 रोजी आपण राजीनामा दिल्याचे पुरावे सादर केले. हे पुरावे विभागीय सहनिबंधकांनी ग्राह्य धरले. परिचारक यांनी संबंधित कारवाई होण्यापूर्वीच संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे अपील मंजूर करण्यात आले आणि त्यांची उमेदवारी कायम राहिली.
हेही वाचा : '...तर आधी योगेश कदमांचा राजीनामा घ्या', NCP नेत्याने रामदास कदमांना डिवचलं!
दरम्यान, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अध्यक्षपदही भाजपकडेच जाण्याची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, सध्या परिचारक यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांनी दोन वेळा स्वतःच्या उमेदवारीचा त्याग केल्याने भाजपला या मतदारसंघात विजय मिळवता आला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 2012 मध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सुरुवातीच्या नेत्यांमध्ये परिचारक यांचा समावेश होता. 2019 मध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. दोन वेळा विधान परिषदेची संधी येऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. अलीकडेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटी घेतल्या असताना परिचारक यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी भूमिका परिचारक यांनी घेतली होती.
परिचारक यांच्या नावाची चर्चा होण्यामागे त्यांचा सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव हेही महत्त्वाचे कारण मानले जात आहे. त्यांना या क्षेत्रातील सुमारे 30 ते 35 वर्षांचा अनुभव आहे. मागीोल 25 वर्षांपासून पंढरपूर अर्बन बँक त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यांनी बँकेची जबाबदारी स्वीकारली तेव्हा बँकेची उलाढाल सुमारे 200 कोटी रुपये होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ही उलाढाल आता जवळपास 3 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून राज्यात बँकेच्या जवळपास 30 शाखा आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रशांत परिचारक यांचा अनुभव आणि राजकीय योगदान या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यांच्या उमेदवारीला मिळालेली वैधता पाहता अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते यावर अवलंबून असेल.
