'भाजपच्या सापळ्यात अडकू नका, योग्य वेळी निर्णय घेऊ..' छठ पुजेवरुन राज ठाकरे आक्रमक

पृथ्वीराज पाटील

13 Nov 2026 (अपडेटेड: 13 Nov 2026, 11:41 AM)

छठपूजेनिमित्त मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

छठपूजेनिमित्त मुंबईत रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी

point

राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray : छठपूजेनिमित्त मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी लावल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. छठपूजेचा मुद्दा वापरुन भाजप संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच हा सगळा आटापिटा उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठी चालला असल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 

हे वाचलं का?

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.  त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. 

भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. 

राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! 

हे ही वाचा : 'मी हात जोडून विनंती करतो, आता हा विषय संपवा...' मुश्रीफ नमले

जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या 12, 14 वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! 

माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. 

भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे!  आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत, जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो! 

हे ही वाचा : दुष्काळाचं संकट 2027 मध्ये कायम राहणार? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच, (अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे *** नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते! येथे मरहट्टे राहातात ते! 

भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा! योग्य वेळी निर्णय घेऊ!