भाजपला रोखण्यासाठी नवी युती, पण फटका INDIA आघाडीलाच? 'असं' आहे नवं राजकीय समीकरण!

अनुजा धाक्रस

• 07:00 AM • 13 Nov 2026

असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीने 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ स्थापन केला आहे.

mim owaisi chandrashekhar azadalliance uttar pradesh election 2027 akhilesh yadav

उत्तर प्रदेशमध्ये नवी युती

Google CTA

लखनऊ: २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी (कांशीराम) यांनी युतीची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा दावा या युतीकडून करण्यात येत आहे. मात्र, राजकीय विश्लेषक आणि निवडणुकीचं गणित पाहता, मुस्लिम-दलित किंवा ‘भीम-MIM’ आघाडीमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA पेक्षा विरोधकांच्या INDIA आघाडीलाच अधिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

१२ नोव्हेंबरला लखनऊमध्ये असदुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पार्टी (कांशीराम) चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ स्थापन करण्याची घोषणा केली. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आझाद यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. चंद्रशेखर आझाद हे सध्या नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. या युतीचं नाव ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ असं ठेवण्यात आलं आहे. मुस्लिम आणि जाटव दलित या दोन समाजांच्या मतांवर या युतीची भिस्त आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही समाज अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या पाठीशी उभे राहिले होते. उत्तर प्रदेशच्या एकूण मतदारांपैकी या दोन समाजांची संख्या जवळपास ४० टक्के असल्याची माहिती आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष (SP) आणि काँग्रेसच्या पारंपरिक मतपेढीला या युतीमुळे धक्का बसू शकतो.

राजकीय विश्लेषक आणि Vote Vibe चे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी India Today Digital शी बोलताना अंदाज व्यक्त केला की, ही नवी आघाडी जवळपास ५ टक्के मतं मिळवू शकते. पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक अटीतटीच्या मतदारसंघांमध्ये या मतांमुळे निकाल बदलू शकतात.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत AIMIM ने ९५ मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. मात्र, एकही जागा जिंकता आली नव्हती. पक्षाला जवळपास ०.४९ टक्के मतं मिळाली होती. दुसरीकडे, चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षालाही खातं उघडता आलं नव्हतं. पक्षाला जवळपास ०.१३ टक्के मतं मिळाली होती. त्यामुळे या वेळी दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद आणि त्यांचं मतांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता किती असेल, हे अद्याप स्पष्ट नाही. याशिवाय, अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्याच्या प्रस्तावामुळे अखिलेश यादव आधीच भाजपच्या निशाण्यावर आहेत. रामजन्मभूमी आंदोलनाबाबत समाजवादी पक्षाची पूर्वीची भूमिका पुढे करून भाजप अखिलेश यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, ओवैसी यांनी समाजवादी पक्षासोबत युती करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले होते. मात्र, अखिलेश यादव यांनी त्यांचे प्रस्ताव फेटाळले. समाजवादी पक्ष AIMIM ला सोबत घेण्यास तयार नसल्यामुळे अखेर ओवैसी यांनी चंद्रशेखर आझाद यांच्याशी हातमिळवणी केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी आणि ओवैसी-आझाद यांना आकर्षित करायचा असलेला जवळपास ४० टक्के मतदारवर्ग पाहता INDIA आघाडीसमोर एक वेगळाच प्रश्न उभा राहतो. उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देण्याच्या सर्वात जवळ पोहोचलेल्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीला ही नवी युती कमकुवत करणार का?

काँग्रेस नेते विजय थोट्टाथिल यांनी X वरील पोस्टमधून ओवैसी-आझाद युतीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची कबुली दिली आहे. सामाजिक परिवर्तन मोर्चाला ‘तिसरी आघाडी नव्हे, तर आपत्ती आघाडी’ असं संबोधत त्यांनी ओवैसी यांच्यावर टीका केली. ते पुढे म्हणाले, “यामुळे उत्तर प्रदेशचं नुकसान होईल. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊन भाजपला निवडणूक जिंकण्यास मदत होईल.”

ओवैसी-आझाद युतीमुळे INDIA आघाडीला फटका का बसू शकतो?

राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांच्या मते, “मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं आणि त्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व ठामपणे मांडावं, यावर ओवैसी भर देत आहेत. त्यामुळे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसकडून नेतृत्वाच्या संधी मिळत नसल्याची भावना असलेल्या तरुण मुस्लिम मतदारांना AIMIM आकर्षित करू शकते.”

हे ही वाचा>> 'सुनेत्रा पवारांच्या NCP चे 22 आमदार सोडू शकतात पक्ष', संजय राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ

तिवारी म्हणतात की, उत्तर प्रदेशच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास २० टक्के लोकसंख्या मुस्लिम समाजाची असतानाही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी या समाजाला पुरेसं राजकीय प्रतिनिधित्व दिलेलं नाही. एवढंच नाही, तर मुस्लिम नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन देण्यासही हे पक्ष तयार नसतात.

उत्तर प्रदेशातील सभांमधून ओवैसी मुस्लिमांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा सातत्याने मांडत आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मुस्लिम समाजाचा केवळ मतपेढी म्हणून वापर केला, मात्र या समाजाला राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फारसं काही केलं नाही, असा आरोप ते करत आहेत.

ते पुढे सांगतात की, ज्या मतदारसंघांमध्ये INDIA आघाडी मुस्लिमेतर उमेदवार उभा करेल आणि AIMIM मुस्लिम उमेदवार देईल, तिथे या युतीचा परिणाम जाणवू शकतो. अशा परिस्थितीत मुस्लिम मतदार स्वतःच्या समाजातील अशा उमेदवाराला पसंती देऊ शकतात, जो भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सोबत जाणार नाही, असं तिवारी यांचं म्हणणं आहे.

पाच टक्के मतांची ताकद किती महत्त्वाची?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालांमधून २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ओवैसी-आझाद युतीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानाचं गणित समजू शकतं. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०३ जागा आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ८० पैकी ३७ जागा जिंकल्या. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला. मुस्लिम आणि दलित मतांचं एकत्रीकरण हे INDIA आघाडीच्या यशामागचं महत्त्वाचं कारण होतं. CSDS-Lokniti च्या २०२४ च्या निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षणानुसार, ९२ टक्के मुस्लिम मतदार, ५६ टक्के बिगर-जाटव दलित मतदार आणि २५ टक्के जाटव दलित मतदारांनी INDIA आघाडीला मतदान केलं होतं.

राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांच्या अंदाजानुसार, २०२४ मध्ये BSP ला मिळालेल्या मतांपैकी जवळपास दोन तृतीयांश मतं जाटव दलित समाजाकडून आली होती. चंद्रशेखर आझाद हे याच समाजातून येतात.

२०२४ मध्ये आझाद यांच्या पक्षाला राज्यभरात एक टक्क्यापेक्षाही कमी मतं मिळाली होती. मात्र, त्यांनी नगीना लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. जाटव समाजातील आणि तरुण मतदारांमधील आझाद यांचा प्रभाव पश्चिम उत्तर प्रदेशात BSP च्या मतांमध्ये फूट पाडू शकतो, असा तिवारी यांचा अंदाज आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या जवळपास २० टक्के लोकसंख्येचा भाग असलेल्या मुस्लिम समाजाला एकत्र आणण्याचा ओवैसी यांचा प्रयत्न आहे.

हे ही वाचा>> '...तर आधी योगेश कदमांचा राजीनामा घ्या', NCP नेत्याने रामदास कदमांना डिवचलं!

तिवारी यांच्या मते, “आझाद जाटव समाजातील जवळपास २ टक्के मतं आपल्याकडे वळवू शकतात. तर ओवैसी मुस्लिम मतदारांमधील एका वर्गाला आकर्षित करून जवळपास २ टक्के मतं मिळवू शकतात. दोघांची मिळून मतांची टक्केवारी ३ ते ७ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. त्यात ५ टक्के हा एक वास्तववादी अंदाज आहे.”

मतांच्या टक्केवारीत झालेला एवढासा बदलही NDA आणि INDIA आघाडीमध्ये अटीतटीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये निकाल बदलू शकतो.

अखिलेश यादव यांच्यासाठी ही बाब महत्त्वाची आहे. कारण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मिळालेलं यश हे यादव, मुस्लिम, काही बिगर-यादव OBC आणि दलित मतदारांना एकत्र आणण्यावर आधारित होतं. यासाठी अखिलेश यादव यांनी PDA हे राजकीय समीकरण मांडलं होतं. सुरुवातीला PDA म्हणजे ‘पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक’ असं होतं.

मात्र, समाजवादी पक्षाचा जनाधार वाढवण्याच्या प्रयत्नात अखिलेश यादव वेगवेगळ्या प्रसंगी PDA चा अर्थ बदलत आहेत. राजकीय संदेशानुसार या तीन अक्षरांची वेगवेगळी स्पष्टीकरणं ते देत आहेत.

PDA चा सर्वात नवा अर्थ म्हणजे ‘पहले दर्शन, फिर आशीर्वाद’ असा आहे. अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्याच्या प्रस्तावावरून भाजप अखिलेश यादव यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी हा अर्थ मांडला आहे.

दलित मतदारांचा कल बदलल्याचं चित्र अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्येही दिसलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील १७ पैकी १५ राखीव जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, पाच वर्षांनंतर २०२४ मध्ये समाजवादी पक्षाने सात, काँग्रेसने एक आणि भाजपने आठ जागा जिंकल्या. उर्वरित नगीना मतदारसंघातून चंद्रशेखर आझाद विजयी झाले.

आता ओवैसी-आझाद युती INDIA आघाडीच्या २०२४ मधील यशात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मुस्लिम आणि दलित या दोन समाजांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या समाजांचा INDIA आघाडीतील पाठिंबा कमी झाला, तर अखिलेश यादव यांच्यासाठी PDA हे समीकरण टिकवणं कठीण होऊ शकतं.

पूर्व उत्तर प्रदेश म्हणजेच पूर्वांचलमध्येही ही नवी युती प्रभाव निर्माण करू शकते, असं तिवारी यांना वाटतं. पश्चिम उत्तर प्रदेशात INDIA आघाडीसाठी आणखी एक आव्हान आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलासोबत युती करून आपलं सामाजिक समीकरण अधिक मजबूत केलं आहे. जाट मतदारांच्या एका वर्गाचा राष्ट्रीय लोकदलाला पाठिंबा आहे.

अशा परिस्थितीत स्वतंत्र मुस्लिम-दलित आघाडी उदयास आल्याने उत्तर प्रदेशातील निवडणुकीचं गणित बदलू शकतं. विशेषतः २०२४ मध्ये एकत्र आलेला मतदारवर्ग समाजवादी पक्ष-काँग्रेस आघाडीला पुन्हा एकदा एकत्र ठेवण्यात अपयश आलं, तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

लेखक आणि एक्झिक्युटिव्ह कोच रंदीप सिसोदिया यांनीही X वरील पोस्टमध्ये ओवैसी-आझाद युतीचा अखिलेश यादव यांच्यावर नकारात्मक परिणाम होईल, असं म्हटलं आहे. त्यांच्या मते, ओवैसी यांना आधीपासूनच उत्तर प्रदेशात मुस्लिमांच्या मोठ्या सभा घेण्यात यश येत आहे. आता चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत युती झाल्यामुळे मुस्लिम मतदारांना ओवैसी हे अधिक प्रभावी आणि निवडणुकीत जिंकण्याची क्षमता असलेले नेते वाटू शकतात.

या युतीमुळे अखिलेश यादव यांच्या मुस्लिम मतपेढीला निश्चितच धक्का बसेल, असा अंदाज सिसोदिया यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, ही युती एक-दोन जागा जिंकू शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ओवैसींचा ‘अब्दुल’ आणि आझाद यांची दलित अस्मितेची भूमिका

ओवैसी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये ‘अब्दुल’ या प्रतिकात्मक पात्राचा उल्लेख केला आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांसाठी अब्दुल पूर्वी केवळ गालिचे अंथरण्याचं काम करत होता, असं ते म्हणाले होते. मात्र, आता हाच अब्दुल उत्तर प्रदेशात आमदार होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

यापूर्वी ओवैसी यांनी INDIA आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला २ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली होती. मात्र, युतीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आला नाही. त्यानंतर AIMIM ने बहुजन समाज पक्षासह इतर पर्यायांचाही विचार केला. अखेर चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मात्र, यावेळी काही संकेत दिसत आहेत. भाजप रामजन्मभूमी आंदोलनाबाबत समाजवादी पक्षाच्या जुन्या भूमिकेवरून अखिलेश यादव यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

राम मंदिर भेटीच्या मुद्द्यामुळे अखिलेश यादव यांची कोंडी?

या राजकीय घडामोडी सुरू असतानाच अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्याच्या अखिलेश यादव यांच्या प्रस्तावामुळे समाजवादी पक्षासमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे. या भेटीमुळे हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसत असला, तरी मुस्लिम मतदार नाराज होण्याचीही शक्यता आहे.

तिवारी यांच्या मते, “अखिलेश यादव यांची ही भूमिका सॉफ्ट हिंदुत्वाचा भाग म्हणून पाहिली जाऊ शकते. हिंदू मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो.” मात्र, या भूमिकेमुळे मुस्लिम मतदारांचा एक वर्ग नाराज होऊ शकतो आणि त्याचा फायदा ओवैसी यांना स्वतंत्र मुस्लिम राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी होऊ शकतो, असंही तिवारी यांनी सांगितलं.

२०२७ च्या निवडणुकीआधी अखिलेश यादव यांच्यासमोर अशा प्रकारे दोन वेगवेगळे दबाव निर्माण झाले आहेत. भाजप आपल्या नेहमीच्या राजकीय मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर ओवैसी-आझाद युती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत INDIA आघाडीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मतदारसमूहांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा दावा सामाजिक परिवर्तन मोर्चाकडून केला जात आहे. मात्र, त्यात त्यांना कितपत यश मिळेल, हे सांगणं सध्या कठीण आहे. पण अमिताभ तिवारी यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ही युती फारशा जागा जिंकू शकली नाही, तरी मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन करून अटीतटीच्या लढतींमध्ये निकालावर प्रभाव टाकू शकते. आणि म्हणूनच, भाजपला आव्हान देण्यासाठी स्थापन झालेली ही नवी आघाडी उत्तर प्रदेशात INDIA आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या अखिलेश यादव यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.