'सुनेत्रा पवारांच्या NCP चे 22 आमदार सोडू शकतात पक्ष', संजय राऊतांच्या दाव्याने मोठी खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील 20 ते 22 आमदार पक्ष सोडू शकतात, असा दावा केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP)दोन गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाच्या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले नाही. त्या म्हणाल्या की, 'योग्य वेळ आल्यावर सर्वांना कळेल.'
दरम्यान, शिवसेना (UBT)खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की, सुनेत्रा पवार यांच्या गटातील तब्बल 20 ते 22 आमदार पक्ष सोडू शकतात. ते असंही म्हणाले की, हे आमदार शरद पवार यांना भेटत आहेत.
विलीनीकरणाबद्दल सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
सुनेत्रा पवार बुधवारी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत होत्या. या बैठकीदरम्यान, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या गटात होणाऱ्या विलीनीकरणाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, "मला माहीत आहे की तुम्हा सर्वांना एका वेगळ्या विषयात रस आहे. आजची पत्रकार परिषद एका वेगळ्या विषयावर आहे. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही कळेल."
हे ही वाचा>> अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे, उपाध्यक्षपदी देशमुख; विखे-थोरात एक्स्प्रेस जोरात!
विलीनीकरणासंदर्भात दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरू आहे की नाही, हे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले नाही. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे या चर्चांना आणखी बळ मिळत असल्याचं आता बोललं जात आहे.
संजय राऊतांचा दावा, 20 ते 22 आमदार सोडणार सुनेत्रा पवारांची साथ
दरम्यान, संजय राऊत यांनी दावा केला आहे की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 ते 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. राऊत म्हणाले की, हे आमदार शरद पवार यांना भेटत आहेत आणि या बैठका केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नाहीत.
राऊत म्हणाले की, हे आमदार निवडणुकीपूर्वी एकतर शरद पवार यांच्या गटात परत येऊ शकतात किंवा दुसऱ्या पक्षात सामील होऊ शकतात. ते म्हणाले की, आमदार त्यांच्या जुन्या राजकीय पक्षात परतले तर त्याला विलीनीकरण म्हणू नये.
प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी 5 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यावर दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर चढला. त्यावेळी पवार यांची प्रकृती बरी नव्हती. या भेटीचा एक व्हिडिओही समोर आलेला. त्यात शरद पवार 10 नोव्हेंबरनंतर होणाऱ्या बैठकीबद्दल बोलताना ऐकू आले. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, ते केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते.
यानंतर, पार्थ पवार यांनीही दोन दिवसांत दोनदा त्यांचे आजोबा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटींमुळे दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले.
हे ही वाचा>> 'अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरेंचा हात?', रामदास कदमांनी उडवून दिली खळबळ
सुनेत्रा पवार यांच्या पक्षात काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे. ज्येष्ठ नेत्यांनी पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुनेत्रा यांनी आमदारांची बैठकही बोलावली होती.
खरं तर, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. तेव्हा अजित पवार शरद पवार यांच्यापासून वेगळे झालेले आणि त्यांनी महाराष्ट्रातील भाजपप्रणित आघाडीला पाठिंबा दिलेला. यानंतर पक्षात दोन गट पडले. सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या गटाच्या अध्यक्षा आहेत. हा गट महायुती सरकारचा भाग आहे. तर दुसरीकडे, शरद पवार (शरदचंद्र पवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटले आहे की, सध्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. मात्र, त्यांनी असेही म्हटले की, जर अजित पवार हयात असते, तर दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले असते.
भाजपच्या संमतीबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला, तर भाजपप्रणित आघाडीशीही सल्ला-मसलत करावी लागेल. भाजप नेते आशिष शेलार यांनी भाऊबीजेचा उल्लेख करत म्हटले की, पवार घराण्यातील भाऊ-बहिणी एकत्र येत असतील तर ही आनंदाची बाब आहे.
सध्या सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिलेला नाही. 20 ते 22 आमदार पक्ष सोडतील, या संजय राऊत यांच्या दाव्यालाही संबंधित आमदारांनी दुजोरा दिलेला नाही.
