'मी हात जोडून विनंती करतो, आता हा विषय संपवा...' मुश्रीफ नमले

गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

ADVERTISEMENT

Kolhapur Politics
Kolhapur Politics
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वादग्रस्त विधानानंतर मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण

point

नेमकं काय म्हणाले?

Kolhapur Politics : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निकालानंतर आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधी पक्षाच्या भडकाऊ विधानांमुळे आणि रोषाच्या भरात आपल्या तोंडून 13 संचालकांना घरी पाठवण्याबाबतचे वक्तव्य गेले, ज्याचे आपण समर्थन करणार नाही, अशी कबुली त्यांनी दिली. तसेच, चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिकाही त्यावेळच्या संतप्त परिस्थितीतील स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे सांगत, आता या वादाला पूर्णविराम देऊन गोकुळच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

'कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम'

या संपूर्ण वादावर बोलताना मुश्रीफ यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. गोकुळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि विजयानंतर काढण्यात आलेल्या मोर्चात पायताणाचा वापर, मुख्यमंत्री व नेत्यांबद्दलचे बदनामीकारक उल्लेख आणि आक्षेपार्ह घोषणाबाजी यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या राजकीय संघर्षात संजय राऊत किंवा रवींद्र धंगेकर यांसारख्या बाहेरील नेत्यांनी उडी मारून कोल्हापूर जिल्ह्याचा अपमान करू नये, असा इशारा देत कोल्हापूरचे प्रश्न आम्ही स्वतः सोडवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सुनावले.

हे ही वाचा : दुष्काळाचं संकट 2027 मध्ये कायम राहणार? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

'हा विषय आता संपला'

गोकुळ दूध संघाचा हा विषय आता संपला असून माध्यमांनी व संबंधितांनी याला आता विश्रांती द्यावी, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले. प्रशासकीय काळामध्ये गोकुळची झालेली सद्यस्थिती पाहता, पशुखाद्यातील तोटा, घटलेले दूध संकलन आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधील वाढलेली दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व संचालक मंडळाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. दूध संकलनाचा टप्पा पंचवीस ते तीस लाखांपर्यंत नेऊन दर्जेदार दूध पुरवठा करण्याचा संकल्प आता केला पाहिजे, असे सांगत त्यांनी भविष्यातील वाटचालीवर भर दिला.

हे ही वाचा : भाजपला रोखण्यासाठी नवी युती, पण फटका INDIA आघाडीलाच? 'असं' आहे नवं राजकीय समीकरण!

'वैयक्तिक पातळीवर दुजाभाव नाही'

राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे स्पष्ट करत मुश्रीफ यांनी सतेज (बंटी) पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदांवरही भाष्य केले. निवडणुकांच्या राजकारणात कितीही संघर्ष झाला तरी वैयक्तिक पातळीवर कोणाशीही दुजाभाव नसून भविष्यातील निवडणुका किंवा संस्थांच्या संदर्भातील निर्णय योग्य वेळी सर्व नेत्यांच्या सहकार्याने ठरवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या टीका आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून आता संपूर्ण लक्ष जिल्ह्याच्या आणि गोकुळच्या विकासावर केंद्रित करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.