शिक्षिकेची हत्या केली, अन् मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून दिवसभर फिरला, आरोपी कसा सापडला?
Crime News : महिला शिक्षिका राणी विश्वकर्मा यांची हत्या केल्याप्रकरणी शाळा व्यवस्थापक विजय निषादला अटक करण्यात आली आहे. मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून आरोपी दिवसभर शहरात फिरत राहिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शिक्षिकेची हत्या केली
अन् मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून दिवसभर फिरला, आरोपी कसा सापडला?
Crime News : उत्तर प्रदेशातील देवरिया येथे महिला शिक्षिका राणी विश्वकर्मा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शाळेचा व्यवस्थापक विजय निषाद याला अटक केली आहे. राणी आणि विजय यांच्यात जवळचे संबंध होते. मात्र, विजय विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. राणीला विजयसोबत लग्न करायचे होते. यासाठी ती त्याच्यावर सातत्याने दबाव आणत होती. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता.
पोलिसांच्या दाव्यानुसार, 31 ऑक्टोबर रोजी विजयने कारमध्येच राणीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवला आणि दिवसभर शहरात तसेच आसपासच्या परिसरात फिरत राहिला. संध्याकाळी त्याने देवरियातील रुद्रपूर परिसरात एका शाळेजवळ मृतदेह फेकून दिला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा : धाराशिवमध्ये खळबळ, घरात घुसून प्रेयसीच्या आई-बहिणीवर कोयत्याने हल्ला, गर्लफ्रेंडचं Ertiga कारमधून अपहरण
लग्नासाठी दबाव टाकल्याने शिक्षिकेची हत्या
राणी विश्वकर्मा या गोरखपूर जिल्ह्यातील झंगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरुहरी गावातील रहिवासी होत्या. त्या चौरी-चौरा परिसरातील नई बाजार येथील व्हीएन सेंट्रल अकॅडमीमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. याच शाळेचा व्यवस्थापक विजय निषाद हा देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. शाळेत काम करत असताना राणी आणि विजय यांच्यात जवळचे संबंध निर्माण झाले होते. मात्र, विजयचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले होती. दुसरीकडे, राणीला त्याच्याशी लग्न करायचे होते. त्यामुळे ती विजयवर लग्न करण्यासाठी सातत्याने दबाव आणत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा : Govt Jobs : इंडियन ऑईलमध्ये मोठी भरती, काय आहेत पात्रतेचे निकष? जाणून घ्या सविस्तर
कारच्या मधल्या सीटवरच विजयने राणीचा गळा आवळला
पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास राणी शाळेत पोहोचल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विजयसमोर लग्नाचा विषय काढला. विजयने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांमधील वाद मिटला नाही. त्यानंतर सकाळी सव्वानऊच्या सुमारास विजय आपल्या कारमधून राणीला घेऊन मिठा बेल गावाबाहेरील निर्जन कच्च्या रस्त्यावर गेला. पोलिसांच्या दाव्यानुसार, कारच्या मधल्या सीटवरच विजयने राणीचा गळा आवळला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विजयने मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवला आणि तो झाकून टाकला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने संध्याकाळ होण्याची वाट पाहिली. या काळात तो मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून शहरात आणि आसपासच्या परिसरात फिरत राहिला. तो चौरी-चौरा परिसराच्या दिशेनेही गेला होता. दरम्यान, बनकट आणि बैरागी या दोन ठिकाणांच्या दरम्यान त्याने राणीचा मोबाईल तोडून रस्त्यावर फेकून दिला. तिचे एटीएम कार्डही त्याने रस्त्यात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संध्याकाळ झाल्यानंतर विजयने देवरियातील रुद्रपूर परिसरात श्रीनेत ग्लोबल स्कूलजवळ राणीचा मृतदेह फेकून दिला आणि तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले. हा मृतदेह राणी विश्वकर्मा यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेली माहिती आणि आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी शाळा व्यवस्थापक विजय निषाद याला अटक केली. चौकशीदरम्यान हत्येशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटकेनंतर आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
