कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते, कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो? खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. प्रत्येक वेळी गुन्हेगारांना वठणीवर आणणारे आक्रमक पोलीस आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण याच पोलीस दादांनी केलेल्या सामाजिक कामामुळे देखील खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडते. असाच काहीसा प्रकार बारामती शहर पोलिसांनी केलेल्या कामातून पहायला मिळाला. ज्याची चर्चा सध्या संपूर्ण शहरात सुरु आहे.
ADVERTISEMENT
त्याच झाल असं की, बारामती तालुक्यातल्या माळेगाव बुद्रुक येथील दिव्यांग व्यक्ती मधुकर वाईकर हे गेली अनेक वर्षांपासून पल्स पोलिओ अभियानाच्या प्रसारासाठी तीन चाकी सायकलवरून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. याच कामासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी बारामती शहरातल्या एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन तीन चाकी एक बाइक घेतली होती. त्यावरुन प्रवास करत ते पोलिओ अभियानापासून स्वच्छता मोहीम, तंटामुक्ती अभियान, लसीकरण मोहीम यासारख्या अनेक सामाजिक कामांसाठी ते प्रचार करायचे. पण या कामातून त्यांना पुरेसे पैसे मिळत नसायचे, मिळायची फक्त शाबासकीची थाप.
दरम्यान, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे वाईकर यांना देखील काम मिळेनासं झालं. लॉकडाउनच्या काळात त्यांना आपल्या बाइकच्या कर्जासाठी सवलत मिळाली. पण लॉकडाउन संपताच पुन्हा एकदा वाईकर यांच्यामागे फायनान्स कंपनीने कर्जासाठी तगादा लावला.
जिथं कुटुंब जगवायची पंचायत झाली तिथं गाडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार? अशा प्रश्न वाईकर यांना पडला. त्यांच्या बाइकचे जवळजवळ 35 हजार रुपये थकले होते. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी जप्त करायची नोटीस बजावली. या नोटीसीमुळे हतबल झालेल्या वाईकर यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फायनान्स कंपनीच्या विरोधात तक्रारी अर्ज केला.
या तक्रारी अर्जावरून बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला बोलून यातून काहीतरी तोडगा काढण्याची विनंती केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्याजात सवलत दिली. पण उरलेल्या कर्जाच्या रकमेचा प्रश्न आलाच. त्यावर कायमचा तोडगा म्हणून पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्गणी करून वाईकर यांचे गाडीचे हप्ते भरण्याची विनंती केली.
यावेळी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवित सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ शक्य तेवढी आर्थिक मदत करीत केली. यावेळी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 22 हजार रुपयांची रक्कम फायनान्स कंपनीला भरून वाईकर यांना त्यांची बाइक कर्जमुक्त करुन दिली. पोलिसांच्या या कृतीमुळे भारावून गेलेल्या वाईकर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पोलिसांच्या याच संवेदनशील भूमिकेमुळे वर्दीतल्या माणुसकीचे देखील सर्वांनाच दर्शन घडले.
ADVERTISEMENT
