तब्बल दोन तास नितीन गडकरी आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा, राजकीय भेट नसल्याची गडकरींची माहिती

मुंबई तक

• 05:09 PM • 03 Apr 2022

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राज्यभरात रंगलेली असताना आणखी एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नितीन गडकरी दाखल झाले. यानंतर ११ वाजून ५० मिनीटांच्या […]

Mumbaitak
follow google news

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राज्यभरात रंगलेली असताना आणखी एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास नितीन गडकरी दाखल झाले. यानंतर ११ वाजून ५० मिनीटांच्या सुमारास ते राज ठाकरेंची भेट घेऊन बाहेर पडले.

हे वाचलं का?

या दोन नेत्यांच्या बैठकीत नेमकं काय घडतंय याची उत्सुकता सर्वांना होती. परंतू ही भेट कौटुंबिक आणि वैय्यक्तिक असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. एका कार्यक्रमात राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर त्यांनी मला नवीन घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार मी आज त्यांच्या आईची भेट घेतली आणि चर्चा केली. गेली ३० वर्ष मी राज ठाकरेंना ओळखतो आहे, या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं गडकरींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांची मैत्री जुनी आहे. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना भाजपला पूरक भूमिका घेतल्याची चर्चा दिवसभर सुरु आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात भाजप आणि मनसेची युती होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं. परंतू ही भेट वैय्यक्तिक असल्याचं गडकरींनी सांगितलं.

राज ठाकरेंच्या भाषणाचं अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून कौतुक, म्हणाली…

रात्री १० वाजल्याच्या सुमारास गडकरी राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले. गडकरींनी रात्रीच जेवण राज ठाकरेंच्या घरी गेल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन नेत्यांच्या भेटींची चर्चा येत्या काही दिवसांमध्ये राज्यात रंगणार असं बोललं जातंय.

राज ठाकरेंच्या भाषणाचं राणेंकडून कौतुक, टीका करणाऱ्या नेत्यांनाही सुनावलं

    follow whatsapp