बृजभूषण शरण सिंह का म्हणाले, राज ठाकरे रावणापेक्षाही पापी

मुंबई तक

11 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:57 AM)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत.मात्र राज ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी राज ठाकरेंची तुलना रावणाशी केली आहे. राज […]

Mumbaitak
follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत.मात्र राज ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी राज ठाकरेंची तुलना रावणाशी केली आहे. राज ठाकरे हे रावणापेक्षाही पापी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत बृजभूषण शरण सिंह?

आपला जो हिंदू धर्म आहे तो हे सांगतो की आपण जर एखाद्या जन्मात काही पाप केलं आहे तर ते दुसऱ्या जन्मातही फेडावं लागतं.त्याशिवाय मुक्ती मिळत नाही अशीही आपल्याकडे धारणा आहे. राज ठाकरेंनी तर २००८ पासून आत्तापर्यंत पापच केलं आहे. अचानक अजान आणि हनुमान चालीसा यांचा मुद्दा त्यांनी पुढे केला आणि आता ते अयोध्येला येत आहेत. राज ठाकरेंचं राजकीय दुकान बंद पडण्याच्या स्थितीत आहे. त्यांचे आमदार किती आहेत? त्यांचं राजकीय महत्त्व आहेच काय? असेही प्रश्न सिंह यांनी विचारले आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात विघ्न, आखाडा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले?

राज ठाकरेंना आमच्या लोकांनी हात जोडून सांगितलं की आमच्याकडे महिला गरोदर आहे, तिची प्रसूती होणार आहे. आम्हाला मुंबई सोडण्यासाठी १५ दिवसांची मुदत द्या. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमची विनंतीही ऐकली नाही. त्यामुळे तशा अवस्थेत त्यांना आमचं गाव गाठावं लागलं. मी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार आहे ज्यामध्ये मी कुणा कुणाला राज ठाकरेंच्या भूमिकेचा त्रास झाला ते सांगणार आहे. उत्तर भारतीयांवर जेवढे अन्याय, अत्याचार राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केले आहेत तेवढे तर रावणानेही केले नाहीत.

आमचे विद्यार्थी परीक्षा द्यायला जातात त्यांना परीक्षा देताना मारहाण केली, टॅक्सी चालकांना मारलं, ठेले चालवणाऱ्यांना मारलं. सगळ्या गरीबांना यांनी मारलं आहे असाही आरोप बृजभूषण यांनी केला. आज राज ठाकरे ज्या मुंबईत इमारती पाहात आहेत ना १८ मजली, २० मजली या सगळ्या इमारती उत्तर भारतीय नसते तर उभ्या राहिल्या नसत्या.

यानंतर बृजभूषण यांना विचारलं गेलं की तुम्ही राज ठाकरेंना माफी मागण्याची मागणी करत आहात मात्र भाजपने पक्ष म्हणून अशी भूमिका घेतलेली नाही. त्याबद्दल काय सांगाल? त्यावर बृजभूषण म्हणाले, “मी माझ्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच सांगितलं की मी भाजप पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलेलं नाही. आम्ही रामाचे वंशज आहोत, त्यानंतर उत्तर भारतीय आहोत आणि मग भाजप खासदार आहे. काल मी तयारी बैठक बोलावली होती त्यात १ लाख लोक आले होते. राज ठाकरेंना माफी मागावीच लागेल ही सगळी या लोकांचीही मागणी होती. राज ठाकरे माफी मागणार नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशाच्या भूमिला स्पर्शही करू शकणार नाहीत. अयोध्येची तर गोष्टच सोडा” असंही बृजभूषण म्हणाले आहेत.

    follow whatsapp