भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे दाखवायचं असल्यानेच खडसेंची ईडी चौकशी-भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांची चौकशी केली जाते आहे. याप्रकरणी आता अन्न वा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे हे खडसेंना दाखवायचं आहे त्यामुळे ईडी चौकशी केली जाते […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:20 AM • 08 Jul 2021

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांची चौकशी केली जाते आहे. याप्रकरणी आता अन्न वा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे हे खडसेंना दाखवायचं आहे त्यामुळे ईडी चौकशी केली जाते आहे, त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

अन्य पक्षातले लोक भाजपमधे गेले की त्यांचे गुन्हे माफ होतात. जे लोक भाजप सोडून अन्य पक्षांमध्ये जातात त्यांना त्रास दिला जातो. एकनाथ खडसे आणि आम्ही सगळेजण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ असाही इशारा छगन भुजबळ यांनी दिला. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मिळालेल्या संधीबाबत विचारलं असता कोरोना काळात त्यांना आरोग्य खात्यासारखं खातं मिळालं आहे याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

जयंत पाटील यांची ही टीका

भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. त्यामुळे ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्यात आले.’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केला.

‘एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील.’ असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे भोसरीचं भूखंड प्रकरण?

2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.

या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली. दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून मला जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने त्रास दिला जातो आहे असं आज सकाळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp