मुंबई: राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, आणि सध्या एकनाथ शिंदे भाजपवर मात करण्यासाठी जे पत्ते टाकत आहेत, ते पाहता मुंबईतील महापालिकेचं राजकारण अजुन संपलेलं नाही असंच दिसतंय. शिंदेंनी शिवसेनेचे 29 नगरसेवक पंचतारांकीत हॉटेलमध्ये का ठेवले, त्यामागे काय कारणं असू शकतात, त्यात कुठल्या शक्यता दडलेल्या असू शकतात? खरा प्रश्न हा आहे. त्याच शक्यतांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 89 जागांवर विजय मिळवलाय तर शिवसेनेनी 29 जागांवर विजय मिळवलाय. दोघांनी महायुतीत निवडणूक लढवली, त्यामुळे दोघांची मिळून मुंबईवर सत्ता आली आणि आकडेवारीप्रमाणे भाजपचा महापौर बसणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट झालं. मात्र खरा खेळ त्यानंतर सुरू झाला.
शिवसेना ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आले. मग अशावेळी प्रश्न निर्माण होतो तो, निकालाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंनी त्यांचे सगळे 29 नगरसेवक पंचतारांकीत हॉटेलमध्ये का ठेवले? असं काय घडलं किंवा असं काय घडू शकतं, ज्यामुळे हा निर्णय घेतला गेला.
हे ही वाचा>> मुंबईत भाजपचा पहिल्यांदाच नाही दुसऱ्यांदा होणार महापौर, 44 वर्षांपूर्वीचा इतिहास घ्या जाणून
शिंदेंच्या पक्ष नेत्यांकडून अगदी तोकडं कारणं त्यासाठी पुढे केली जातायत, नगरसेवकांचं दोन दिवसीय शिबीर आहे, त्यांना आम्ही प्रशिक्षण देण्यासाठी बोलावलंय वगैरे वगैरे. पण निकाल्याच्या दुसऱ्या दिवशी नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामाला हलवणं हे राजकारणाची थोडी जरी जाण असेल तर एक सामान्य व्यक्ती ही कारणं हास्यास्पद ठरवू शकतो. मग यामागच्या शक्यता काय असू शकतात? तेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
1. शक्यता पहिली – भाजपचाच महापौर होणार
शिंदेंनी जरी हॉटेलमध्ये नगरसेवकांचा मुक्काम हलवला असला तरी भाजपकडून अद्याप यावर कुठलीही तीव्र प्रतिक्रिया आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यावर महापौर पदाच्या हालचालींना वेग येईल. शिंदेंना त्यांच्या पक्षातील अंतर्गत निर्णय काय घ्यायचे ते घेऊ द्या, असंही भाजपला वाटत असेल.
याचाच अर्थ असाही निघतो की, महापौर हा भाजपचाच होईल. शिंदेंनी कितीही दबावाचं राजकारण खेळलं तरी भाजप त्याला दाद देणार नाही आणि भाजपशिवाय शिवसेनेचा महापौर बसेल याची सुतराम शक्यता नाही. त्याचाच दुसरा अर्थ असाही निघतो की, शिंदेंकडून जे सांगितलं जातंय की नगरसेवकांचं शिबीर आहे, ते आपण तसंच कारण असावं असं मानून चालायचं. अगदी स्वच्छ नजरेने या घटनांकडे बघायचं आणि सोडून द्यायचं. दुसऱ्या कुठल्याही शक्यतांचा विचार करायचा नाही. परंतू राजकारणाकडे शक्यतांचा खेळ म्हणून बघितल्यास यात अनेक शक्यताही दिसून येतात.
2. शिवसेनेचाच महापौर बसवायचा
एकनाथ शिंदे यांचे 'हॉटेल पॉलिटिक्स' हे बार्गेनिंग पॉवर तर नाही ना! शिंदेंनी नगरसेवक हॉटेलवर हलवले आणि त्याचवेळी बातमी समोर आली किंवा आणण्यात आली, शिंदेंना शिवसेनेचा महापौर बसवायचाय. अडीच वर्षे तरी शिवसेनेचा महापौर व्हायला हवा, असं शिवसेनेला वाटतंय. मग यामागची कारणं काय असू शकतात? एकतर पुढील वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, अशावेळी शिवेसनेचा महापौर मुंबईत नसला तर त्याचा विपरीत संदेश जाऊ शकतो. आपल्याकडे तर 29 नगरसेवक आहेत पण आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येत नाही. मग त्यासाठी भाजपवर दबाव आणायचा.
3. फोडाफोडीची भीती वाटतेय का?
दुसरीकडे शिवसेनेला कुठलीही फोडाफोडी टाळायचीये आणि कुठेही दगाफटका होऊ नये असंही वाटत असेल. किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात मुंबईतले आपले नगरसेवक इतरत्र (अर्थात भाजप) कुठेही जाऊ नयेत असं वाटतंय. मात्र त्याची शक्यता फार कमी दिसतेय. कारण भाजपने असं पाऊल उचललं तरी महापौर पदासाठी त्यांना 26 नगरसेवकांची गरज पडणार आहे. त्यातच मुंबईत तरी स्वतःविषयीची प्रतिमा ते डागाळून घेणार नाही.
हे ही वाचा>> मुंबईच्या महापौर पदाबाबत एकनाथ शिंदे यांचं सुचक वक्तव्य म्हणाले, 'महापौर हा...'
मात्र दुसऱ्याबाजूला जोपर्यंत महापालिकेत गट निर्माण करून तो अधिकृत केला जात नाही तोपर्यंत नगरसेवक पळवापळवीची भीती ही असतेच. आज विभागीय आयुक्तांकडे गटाची नोंदणी होणे अपेक्षित होते. आणि त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आज हॉटेल सोडणारही होते. मात्र सरकारकडून गॅझेट काढण्यास विलंब होत असल्याने आता गट नोंदणी उद्यावर ढकलली गेली आहे. त्यामुळे नगरसेवकांचा हॉटेलमधील मुक्काम वाढल्याचंही पाहायला मिळालं. याचाच अर्थ शिवसेनेला अजूनही फोडाफोडी होऊ शकते, असं तर वाटत नाही ना?
4. मुंबईतील अस्तित्वाची लढाई
मुंबईत बाळासाहेबांचे खरे वारसदार आम्हीच आहोत, हा यावेळेसच्या निवडणुकीचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही आणि दुसऱ्या बाजूला राज-उद्धव ठाकरेंनी 71 नगरसेवक निवडून आणत खरी शिवसेना आणि खरे वारसदार आम्हीच असल्याचं सिद्ध केलं. अर्थात शिवसेना एकसंध असताना गेल्या वेळेस ठाकरेंनी शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आणले होते. यावेळेस तो आकडा त्यांना गाठता आला नाही.
अशावेळी मुंबईवर शिवसेनेचा महापौर असणे शिंदेंसाठी 'खरे वारसदार' सिद्ध करण्यासाठी अनिवार्य ठरू शकतं. मुंबईत शिवसेनेचा महापौर झाल्यास (भलेही एक वर्ष किंवा अडीच वर्षं का असेना!) बाळासाहेबांचा मीच खरा वारसदार असल्याचं ते ठासून सांगू शकतात. त्यासाठी तर शिंदे भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत नसावे?
5. स्थायी समितीवर डोळा
महापौर पद हवे असं कारण पुढे करून किमान स्थायी समितीचे अध्यक्षपद तरी मिळावे यासाठी शिंदे दबावतंत्राचा तर वापर करत नाही ना! ही शक्यता जास्त असू शकते. याआधी ज्या-ज्यावेळेस शिवसेना-भाजपची मुंबईवर सत्ता आली त्यावेळेस शिवसेनेनी भाजपला फक्त उपमहापौरपद दिलेले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद, बेस्टचे अध्यक्षपद स्वतःकडेच ठेवलेले आहे.
आता चित्र पालटलं आहे. भाजप मोठा भाऊ झाला असून शिवसेना छोटा भाऊ झाला आहे. अशावेळी भाजपने मागचाच कित्ता गिरवल्यास (तशीच शक्यता जास्त आहे, भाजप एकही पद सोडायला तयार नसल्याच्या बातम्या आलेल्या आहेत.) आपल्याला कुठलेही महत्त्वाचं पद मिळणार नाही, हे शिंदेंना माहितीये. त्यामुळेच महापौर पदाचं कारण पुढे करून स्थायी समिती किंवा गेलाबाजार बेस्टचं अध्यक्षपदी तरी मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न असू शकतात.
महापौरपद नाही तर किमान पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच स्थायी समिती अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदे गट आग्रही असू शकतो.
6. मुंबई भाजपच्या दावणीला
यावेळेस भाजपने 137 जागांवर उमेदवार दिले आणि पहिल्यांदाच युतीमध्ये शिवसेनेला 90 जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर आता भाजपचा महापौर बसणार हे स्पष्ट झालं आहे. अशावेळी सोशल माध्यमांवर निकालानंतर शिंदेंनी भाजपचा महापौर बसवला म्हणून टीका होऊ लागली आहे. ठाकरेंकडूनही भाजपचा महापौर बसणार असल्याकडे अंगुलीनिर्देश केला जातोय.
उद्याच्याला भाजपचा महापौर मुंबईत बसला तर ‘बघा शिंदेंच्या शिवसेनेनी भाजपचा महापौर बसवून दाखवला’, ‘मुंबई भाजपच्या दावणीला बांधली’, अशी टीका होऊ शकते. मुंबईसह महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसू शकतात. अशावेळी शिंदे कुठलीही रिस्क घ्यायच्या तयारीत नसतील आणि मुंबईत पाच वर्षांपैकी किमान सुरूवातीला तरी शिवसेनेचा महापौर बसावा यासाठी प्रयत्न करत असण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्याशिवाय भाजपला मुंबईत पूर्ण वर्चस्व गाजवता येणार नाही.
7. मुंबई हातातून जाण्याची भीती
मुंबईत भाजपचा महापौर बसवून भाजप भविष्यात मुंबईवर मजबूत पकड बसवणार यात कुठलीही शंका नाही. शिंदे यांना हे ठाऊक आहे की जर मुंबईही भाजपच्या हाती गेली, तर भविष्यात त्यांच्या पक्षाची (शिवसेनेची) जागा भाजप हळूहळू व्यापून टाकेल. त्यामुळे स्वतःचा महापौर असणे हे त्यांच्यासाठी 'बार्गेनिंग चिप' (Bargaining Chip) आहे.
मुंबईत जागा कमी आल्या तरी शिवसेनेचा महापौर झाला असं ठसवण्यात शिंदे यशस्वी होऊ शकतात. अमित शाह यांच्याशी असलेले जवळचे संबंध हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे.
राज्यातील भाजप नेत्यांशी संघर्ष झाला तरी, दिल्लीतून आपले वजन वापरून ते आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतात. महापौराच्या मुद्द्यावरून ते दिल्लीला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतील की, महाराष्ट्रात 'मराठी कार्ड' आणि 'शिवसेना' जिवंत ठेवायची असेल, तर मुंबईत शिवसेनेचा महापौर होणे महायुतीसाठी कसे हिताचे आहे.
8. 'धक्कातंत्र' आणि सोशल मीडिया नरेटिव्ह
आधी म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचा महापौर होणार नाही आणि त्यासाठी शिंदे दोषी असल्याचा नरेटिव्ह एव्हाना सोशल मीडियावर पसरू लागला आहे. या नरेटिव्हला छेद देणे किंवा असे विषय लांबवत नेऊन धक्कातंत्राचा वापर करणे भाजपला बखूबी जमत असते.
अशावेळी ठाकरेंची सत्ता गेल्यानंतर एकनाथ शिंदेंना जसं उपमुख्यमंत्रीपदासाठी हे सगळं केलं, असा नरेटिव्ह सुरू असताना भाजपने मुख्यमंत्री केले होते, तसंच आता शिंदेंना महापौरपद देऊन भाजप "आम्ही सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी एकत्र आहोत" हा संदेश देऊ शकते. भाजप (विशेषतः मोदी-शाह जोडी) अशा वेळी 'लार्जर दॅन लाईफ' भूमिका घेऊन शिंदेंना महापौरपद देऊ शकते. यामुळे "आम्ही सत्तेचे भुकेले नाही, तर हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेबांच्या आदरार्थ शिंदेंना साथ देतोय," हा संदेश जनतेत जाईल.
अशाने विरोधकांचा नरेटिव्ह फेल करणे भाजपला शक्य होईल. तसेच आतापर्यंत ठाकरेंसोबत सत्तेत असूनही मुंबईतील नागरी समस्यांचे खापर फक्त ठाकरेंवरच फोडले जाते तसे आताही करता येऊ शकते. भविष्यात शिवसेनेच्या महापौरांच्याबाबतीत तसे होणार नाही, याची गॅरंटी कोण देऊ शकेल. नाही तरी भाजप हा नेहमी त्यांच्या दीर्घकालीन खेळीसाठी ओळखला जातो. समोरच्याला तात्पुरता गाफील ठेऊन दीर्घकालाचे नियोजन केले जात असते.
पण भाजप खरंच असं करेल का? कारण भाजपला ही चालून आलेली सुवर्ण संधी आहे. भाजपने त्यासाठी सगळ्याप्रकारची मेहनत घेतलेली आहे.
9 देवाण-घेवाणची शक्यता
कल्याण–डोंबिवलीमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करतेय. तर तसेच प्रयत्न शिवसेनेकडूनही सुरू आहे. विशेष म्हणजे दोघेही युतीत इथे लढले आहेत. भाजपने मुंबई सोडून इतरत्र कुठेही त्रास देऊ नये यासाठी शिंदेंनी ही खेळी खेळली असण्याची एक शक्यताही जास्त आहे. पण शिंदे मुंबई महापालिकेत पदं मागत असतील तर भाजप मुंबईच्या बदल्यात ठाणे/कल्याण–डोंबिवलीत स्वतःचा महापौर बसवू शकते किंवा त्याबदल्यात इतर कुठली डिल करू शकते. म्हणजे हो दोन्ही बाजूने होऊ शकते. नाही तरी ताज्या बातमीनुसार, मंगळवारी, 20 जानेवारीला ताज लँड हॉटेलमध्ये, जिथे नगरसेवक ठेवलेले आहेत, तिथेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होत आहे.
10. ठाकरे बंधूंची युती आणि 'मराठी कार्ड'
राज-उद्धव यांची एकजूट आणि दोघे ठाकरे एकत्र आल्याने मराठी मतदारांमध्ये गेलेला सकारात्मक संदेश खोडून काढण्यासाठी शिवसेना आणि भाजप वरील काही शक्यतांवर नक्कीच विचार करत अकसतील असं आपण गृहीत धरुयात. मराठी अस्मितेचा हा नरेटिव्ह टिकल्यास भविष्यात अडचणीचे ठरू शकते, असं वाटणे साहजिक आहे. शिंदेंनी 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले आहेत, कारण त्यांना हे ठाऊक आहे की "नंबर गेम" मध्ये ते लहान असले तरी "डिसायडिंग फॅक्टर" आहेत. हे निव्वळ दबावतंत्र नसून, पुढील 5 वर्षे मुंबईच्या सत्तेत समान भागीदारी मिळवण्याची ही धडपड आहे.
जाता-जाता...
भाजपची संख्या जास्त आहे. त्यांचाच महापौर होईल असं सरळ आणि स्पष्ट दिसतंय. अशावेळी भाजपचा महापौर इतक्या सहजासहजी होऊ दिला नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्नही शिंदेंकडून सुरू नसेल असं कशावरून? मतदारांमध्ये तसेच स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संदेश तर नक्कीच जाईल.
ADVERTISEMENT











