राज्यपालांच्या विमान प्रवास वादावर CM ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

• 10:22 AM • 12 Feb 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (12 फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जव्हारच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राज्यपालांच्या विमान प्रवासबाबत विचारण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर थेट काही भाष्य करणं टाळलं. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (12 फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रवासावरुन झालेल्या वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज जव्हारच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांना राज्यपालांच्या विमान प्रवासबाबत विचारण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यावर थेट काही भाष्य करणं टाळलं. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की, ‘आता विमानाचा विषय निघालाच आहे तर माझा असा विचार आहे की इथेच (जव्हार) आपण एक छोटी धावपट्टी तयार करु. म्हणजे सगळ्यांचीच विमानं इथे उतरतील.’ अशी मिश्किल टिप्पणी करत मुख्यमंत्र्यांनी या विषयाला बगल दिली.

हे वाचलं का?

दरम्यान, राज्यपालांच्या विमानाप्रवासाबाबत आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मात्र ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘राज्यपालांना विमानातून उतरवणे हा पोरखेळ आहे. खरं तर हा घटनात्मक पदाचा अपमान आहे. मुख्यमंत्री ठाकरेंकडे विमान प्रवासाच्या परवानगीची फाइल गेली होती पण ती मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली.’ असं म्हणत दरेकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

राज्यपालांच्या विमान प्रवासाचा नेमका वाद काय?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काल (11 फेब्रुवारी) सकाळी देहरादून येथील लाल बहादूर अॅकेडमी येथील कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्यासाठी ते शासकीय विमानात देखील बसले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना सांगण्यात आलं की, या विमानाला उड्डाणासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यपालांना त्या विमानातून पुन्हा खाली उतरावं लागलं. त्यानंतर राज्यपालांना ऐनवेळी तिकीट काढून व्यावसायिक विमानातून प्रवास करावा लागला.

ही बातमी पाहिली का?: ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?

यानंतर राज्यपालांच्या कार्यालयाकडून असे स्पष्टीकरण देण्यात आले की, ‘मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य सरकारला संबंधित प्रवासाबाबत २ फेब्रुवारीला कळविण्यात आलं होतं. पण असं असून देखील आज राज्यपाल विमानात बसल्यानंतर त्यानंतर सांगण्यात आलं की, राज्य सरकारकडून जी परवानगी लागते ती मिळालेली नाही. त्यामुळे आपल्याला प्रवास करता येणार नाही.’

राजभवन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या या उत्तरानंतर राज्य सरकारने देखील याबाबत तात्काळ स्पष्टीकरण देत असं म्हटलं होतं की, ‘राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही.’

हे देखील वाचा : राज्यपालांना विमान प्रवास नाकारला, ठाकरे सरकारवर चिडले भाजप नेते

प्रचंड इगो असलेलं सरकार: फडणवीस

दरम्यान, याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं होतं की, ”राज्यपाल पोचल्यानंतर त्यांना विमानात बसू न देणं किंवा विमानातून उतरवणं हे अतिशय चुकीचं आहे. कुठल्या पदाचा आपण अपमान करतोय. राज्यपाल ही काही व्यक्ती नाही. एक व्यक्ती येत, एक व्यक्ती जाते. पण महाराष्ट्राच्या इतिहासात इतका इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं.’ अशी तिखट प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

    follow whatsapp