‘आज संपूर्ण महाराष्ट्रच वाऱ्यावर’; एकनाथ खडसेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

राज्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्यावर राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘आज संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. प्रशासनावर जबाबदाऱ्या सोपवून दिल्या आहेत. मंत्री, राज्यमंत्री नसल्यामुळे आज मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असं एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. […]

Mumbai Tak

मुंबई तक

25 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

follow google news

राज्यात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्यावर राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘आज संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. प्रशासनावर जबाबदाऱ्या सोपवून दिल्या आहेत. मंत्री, राज्यमंत्री नसल्यामुळे आज मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असं एकनाथ खडसे म्हणाले.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ११ जुलै रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या येत होत्या.

मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सुनावण्या झाल्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अजून आली नाही. विरोधी पक्षांकडून या मुद्यावर शिंदे आणि फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं दररोज समोर येत आहे. आता या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

एकनाथ खडसे हे जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी पुरात झालेल्या नुकसानीवर भरपाई मिळण्यासंदर्भात बोलताना सरकारवर टीका केली. संकटांच्या काळात सरकारने पूरग्रस्तांच्या मागे उभं राहायला पाहिजे, त्यांना लवकरात लवकर मदत कशी पोहचेल यावर भर दिला पाहिजे, असं खडसे यांचं म्हणणं आहे. याचं मुद्याला पुढे नेत खडसे म्हणाले, आतापर्यंत माणसं वाहून गेले तर त्यांच्या कुटुंबियांना मदत द्यायचो. घराची पडझड, जनावरं मरण पावली, आर्थिक नुकसान झाली त्यांना मदत दिली जायची. मात्र, आता संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, अशी टीका खडसे यांनी केली आहे.

प्रशासनावर जबाबदारी सोपवून दिली आहे. मंत्री, राज्यमंत्री नसल्यामुळे आज अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिकारी आपल्या चौकटीत जे आहे. नियमांमध्ये असेल ती कार्यवाही करू शकतो. लोकप्रतिनिधी मात्र राज्याचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडू शकतो. काही त्रुटी असतील तर सरकारच्या निदर्शनास आणून देऊ शकतो, पण दुर्दैवाने मंत्री, राज्यमंत्रीच नसल्यामुळे ती परिस्थिती नसल्याची खंतही खडसेंनी व्यक्त केली.

शिंदे, फडणवीस यांची सरकार आल्यापासून राज्यातील मंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील दोनच मंत्री निर्णय घेत असल्याच्या मुद्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी ते भाजपच्या हायकमांडशी चर्चा करुन मंत्र्याच्या नावाच्या यादीवर शिक्कामोर्तब केला जाईल, अशी देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मंत्रीमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे.

    follow whatsapp