शिवसेनेला नवी मुंबईत झटका! शिवसेनेतील राज्यमंत्री दर्जा असलेले बडे नेतेच शिंदेंच्या गटात

मुंबई तक

• 05:10 AM • 08 Jul 2022

आमदारांच्या बंडखोरींनतर एकनाथ शिंदेंचं प्रस्थ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील माजी नगरसेवकही उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला झटका बसला आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्यांमध्ये राज्यमंत्री दर्जाचं पद असणाऱ्यांचाही समावेश आहे. सुमारे ५० आमदारांना घेवून वेगळा गट बनवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

आमदारांच्या बंडखोरींनतर एकनाथ शिंदेंचं प्रस्थ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील माजी नगरसेवकही उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला झटका बसला आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्यांमध्ये राज्यमंत्री दर्जाचं पद असणाऱ्यांचाही समावेश आहे.

हे वाचलं का?

सुमारे ५० आमदारांना घेवून वेगळा गट बनवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यानंतर तातडीने राज्यमंत्री दर्जा असणाऱ्या नवी मुंबई शहरातील दोन नेत्यांच्या नेतृत्वात नवी मुंबई शहरातील दिग्गज नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल होत सेनेला झटका दिला.

महाराष्ट्र राज्य वडार समन्वय समितीचे अध्यक्ष आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना राज्य मंत्री दर्जा असून ऐरोली परिसरात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या समवेत तूर्भेमध्ये वर्चस्व असलेले स्थायी समिती माजी सभापती सुरेश कुलकर्णी, माजी नगरसेवक ममित विजय चौगुले यांच्या सकट सुमारे तीसपेक्षा अधिक माजी नगरसेवक आणि स्थानिक सेना नेत्यांची मोट बांधणारे राज्यमंत्री दर्जाचं पद असलेले मुंबई झोपडपट्टी महामंडळ अध्यक्ष विजय नाहटा यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेवून शिंदे गटात सामील होण्याचे संकेत दिले आहेत.

नाहटा हे नवी मुंबई मनपाचे आयुक्त होते. निवृत्तीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांना उपनेतेपद देण्यात आलं. याचबरोबर भाजप आणि शिवसेनेची सत्ता आल्यावर त्यांना मुंबई म्हाडा संलग्न मुंबई झोपडपट्टी प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून दिलेली नेमणूक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर कायम ठेवण्यात आले. त्यांनी बेलापूर विधानसभा निवडणूक गणेश नाईक व विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात लढवल्यावर अवघ्या तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

नवी मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच घोषित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची कास धरल्याने नवी मुंबई शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आणखी दिग्गज माजी नगरसेवक लवकरच शिंदे यांच्या गटात जातील, असंही सांगितलं जात आहे.

विजय चौगुले यांनी शिवसेनेकडून एक वेळा लोकसभा, तर दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. ते नवी मुंबई शहराचे शिवसेना जिल्हाप्रमुख देखील होते. नवी मुंबई शहरात शिवसेनेचे ३८ नगरसेवक होते. यातील २० नगरसेवक हे चौगुले यांना मानत असल्याने नवी मुंबई शहरात एकनाथ शिंदे यांना मोठी ताकद मिळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई शहरातील शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री बंगल्यावर शिवसैनिकांनी जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निष्ठेचे दर्शन घडवलं होतं. मात्र आता शिवसेनेचा निष्ठावंत आणि एकनाथ शिंदे यांचा ‘एक’निष्ठ असे दोन गट बघायला मिळणार आहे. नवी मुंबई मनपा निवडणुकीत भाजप व शिंदे यांच्याकडून युती बाबत भूमिका स्पष्ट झाल्यावर नवी मुंबई शिवसेनेला गळती लागण्याची चिन्हे आहेत.

नवी मुंबई भाजपचे सर्वेसर्वा आमदार गणेश नाईक यांच्याशी थेट लढत देण्याची ताकद असणारे दोन महत्वाचे नेते विजय नाहटा आणि विजय चौगुले यांनी शिंदे यांच्या गटात जाण्याच्या निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीत होणाऱ्या संघर्षात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी स्थानिक पातळीवर युतीबाबत काय निर्णय होतो यावर शिवसेनेचे पदाधिकारी आपला निर्णय घेणार आहेत.

गणेश नाईक यांची साथ सोडून आलेले नगरसेवक शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले असल्याने युतीबाबत निर्णय होण्याची प्रतीक्षा हे स्थानिक नेते करत आहेत. हमखास निवडून येणाऱ्या या नगरसेवकांना राजकीय हमी मिळाल्यावर त्यांच्या सोबत शिवसेनेचे आणखी पदाधिकारी शिंदे यांच्या गटात सहभागी होतील. या पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्यासाठी विजय नाहटा यांनी गळ टाकला आहे.

त्यांना अनेक पदाधिकाऱ्यांनी सोबत येण्याची हमी दिली आहे. तर विजय चौगुले यांच्यासोबत त्यांचे कट्टर समर्थक आपसूक शिंदे गटात सामील झाल्याने नवी मुंबई शिवसेनेत मोठे खिंडार पडले आहे. दक्षिण विभागाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनीही उद्धव ठाकरे निष्टावंत गटात हजेरी लावल्याचे दिसले आहे. मात्र शहरातील अनेक पदाधिकारी शिंदे यांच्याकड़े खेचुन नेण्यात नाहटा आणि चौगुले यशस्वी झाले आहेत.

पनवेल परिसरातील मोठे राजकीय प्रस्थ महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत शिंदे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून शिंदे यांना समर्थन वाढत असताना पनवेल मधून जिल्हाप्रमुख शिरीष घरत व नवी मुंबई शहरातून जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे ,उपजिल्हा प्रमुख महिला संघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख विजय माने यांच्याकडून शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठक घेवून उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याच्या आणाभाका घेण्यात येत आहे.

    follow whatsapp