नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दोन वेळा आमदार राहिलेल्या शिवसैनिकाला उमेदवारी जाहीर केली आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघात ३० ऑक्टोबर पोटनिवडणूक होत असून, भाजपन शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना तिकीट दिलं आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, भाजपने शिवसेनेच्याच नेत्याला गळाला लावत आघाडीसमोर आव्हान उभं केलं आहे.
रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेल्या सुभाष साबणे यांना पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
सुभाष साबणे शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, अचानक भाजपने तिकीट जाहीर केल्यानंतर ते शिवसेना सोडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजपत जाण्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जबाबदार असल्याची टीका साबणे यांनी केली आहे. अशोक चव्हाण हे जिल्ह्यात शिवसेना संपवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशोक चव्हाण यांची जिल्ह्यात एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज होऊन मी हा निर्णय घेत नसल्याचं साबणे यांनी म्हटलं आहे.
काळे झेंडे दाखवले म्हणून माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्यात आलं. हे मी वरिष्ठांनाही सांगितलं होतं. पंतप्रधानांनाही काळे झेंडे दाखवले जातात, मात्र बुटाने मारण्याचं काम अशोक चव्हाणांनी केलं असा आरोप साबणे यांनी केला आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. तर 3 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपनं आज सुभाष साबणे यांना तिकीट जाहीर केलं असून, ते उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार आहेत.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीबरोबरच भाजपने मिझोराममधील तुरियाल आणि तेलंगानातील हुजुराबाद पोटनिवडणुकीसाठीही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तुरियालमधून लालदीनथारा यांना तिकीट देण्यात आलं आहे, तर हुजुराबाद पोटनिवडणुकीसाठी एटेला राजेंदर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT











