लसीकरणाचा उच्चांक! भारताने लसीकरणात ओलांडला 100 कोटी डोसचा टप्पा

मुंबई तक

• 05:39 AM • 21 Oct 2021

कोरोनाच्या विषाणूनं थैमान घातल्यानंतर भारतासह जगाच्या नजरा संजीवनी ठरणाऱ्या कोरोना लसीकडे लागल्या होत्या. अथक परिश्रमानंतर लस शोधण्यात यश आलं आणि लसीकरणाचा श्रीगणेशा झाला… बघता बघता आज देशाने लसीकरणात मैलाचा टप्पा पार केला. भारताने १०० कोटी डोस देण्याचा उच्चांकाची आज नोंद केली. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबद्दल भीती कमी […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या विषाणूनं थैमान घातल्यानंतर भारतासह जगाच्या नजरा संजीवनी ठरणाऱ्या कोरोना लसीकडे लागल्या होत्या. अथक परिश्रमानंतर लस शोधण्यात यश आलं आणि लसीकरणाचा श्रीगणेशा झाला… बघता बघता आज देशाने लसीकरणात मैलाचा टप्पा पार केला. भारताने १०० कोटी डोस देण्याचा उच्चांकाची आज नोंद केली.

हे वाचलं का?

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबद्दल भीती कमी होऊन नागरिकांचा लस घेण्याकडे कल वाढला. देशात १६ जानेवारी २०२१ रोजी पहिला डोस दिला गेला. अपुरं उत्पादनामुळे देशातील लसीकरणाची सुरुवात संथगतीने झाली होती. मात्र, नंतर लसीकरणाने गती घेतली.

सुरुवातीच्या टप्प्यात देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १ मार्चपासून देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती.

१ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर १ मे २०२१ पासून देशातील १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या देशात ६३,४६७ केंद्रावर लसीकरण केलं जात असून, यात ६१,२७० केंद्र सरकारी आहेत, तर २,१९७ केंद्र खासगी आहेत.

महाराष्ट्र देशात कोणत्या क्रमांकावर?

भारताने शंभर कोटी डोस देण्याची विक्रमी कामगिरी गुरूवारी केली. यात सर्वाधिक डोस देणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात 12,21,40,914 डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 9,32,00,708 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 6,85,12,932, गुजरात 6,76,67,900 आणि पाचव्या क्रमांकांवरील मध्य प्रदेशात 6,72,24,286 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत.

18 वर्षावरील 74.9 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस

देशाने कोरोना लसीकरणात मैलाचा टप्पा पार केला असून, समोर आलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशातील 18 वर्षापुढील 74.9 टक्के लोकांनी कोरोना एक डोस घेतला आहे. तर 18 वर्षापुढील 30.9 टक्के लोकसंख्येचं पूर्णपणे लसीकरण झालं आहे. भारताने 16 जानेवारी ते 21 ऑक्टोबर या 9 महिन्यांच्या कालावधीत शंभर कोटी डोस देण्याचा टप्पा पार केला आहे.

    follow whatsapp