Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (28 जानेवारी) विमान अपघातात मृत्यू झाला. विमान बारामतीत लॅन्ड होत असतानाच हा भीषण अपघात झाला. दरम्यान, विमानात उपस्थित असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला असून गुरुवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाची मूलतत्त्वे शिकली. मागील 16 वर्षे महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी अजित पवारांनी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं.
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश
अजित पवार यांनी त्यांच्या 45 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकदा खासदार, आठवेळा आमदार आणि सहावेळा उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. शिवाय, ते महाराष्ट्रात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री होते. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा राजकीय केंद्रबिंदू मानले जात होते आणि त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं राजकीय संतुलन राखण्यासाठी अजित पवारांना आपल्यासोबत ठेवलं. अजित पवार यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला. 1982 साली एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आल्यावर अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बनले आणि त्याच वर्षी ते पहिल्यांदा बारामतीतून काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळवून खासदार म्हणून निवडून आले.
सलग 8 वेळा आमदार
मात्र, काही काळानंतर त्यांनी आपले काका शरद पवार यांच्यासाठी ते पद सोडलं आणि नंतर या पदासाठी शरद पवारांनी पोटनिवडणूक जिंकली आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले. त्यानंतर, अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी 1993 मध्ये विधानसभा निवडणूक लढली. यानंतर ते सलग 8 वेळा आमदार राहिले. अजित पवारांनी 1993 आणि 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 1999, 2004, 2009, 20014 आणि 2024 मध्ये आमदार झाले. जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना मंत्री करण्यात आलं. अशाप्रकारे, त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत स्वत:चा प्रभावही निर्माण केला.
सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवलं
त्यांना सरकारमध्ये बरीच महत्त्वाची मंत्रीपदे भूषवण्याचा अनुभव आहे, त्यांनी राज्य सरकारमध्ये कृषी, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं, तसेच सुधाकर नाईक यांच्या सरकारमध्ये कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केलं. अजित पवार यांनी सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्यांनी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले असून पहिल्यांदा 2010 ते 2012 दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014 पर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा काम केलं. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर, अजित पवार अनपेक्षितपणे भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले. परंतु, त्यावेळी अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
नंतर, अजित पवार शरद पवारांसोबत गेले आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि एका वर्षानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 आमदारांसह महायुती आघाडीत ते सामील झाले. 2023 मध्ये, अजित पवार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर, अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. अशाप्रकारे, गेल्या 15 वर्षांत स्थापन झालेल्या प्रत्येक सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
हे ही वाचा: Ajit Pawar: अवघा महाराष्ट्र पोरका... उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन
1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंचन मंत्री झाल्यावर अजित पवार यांचे महाराष्ट्रातील मोठे राजकीय स्थान आले. 2004 मध्ये, अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत असल्याची एक राजकीय संधी निर्माण झाली. पण शरद पवारांच्या राजकीय समीकरणांमुळे अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागली. 2004 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून विधानसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी, काँग्रेसला 69 आणि NCP ला 71 जागा मिळाल्या होत्याकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या सूत्रानुसार, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार होतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा असतानाच काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले.
सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांचे संबंध चांगले होते. अजित पवार यांना शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होते, परंतु सुप्रिया सुळे यांच्या प्रवेशानंतर परिस्थिती उलट झाली. राजकीय महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन, अजित पवार यांनी त्यांच्या काकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये, अजित पवार यांनी 40 आमदारांसह एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हाती घेतलं. 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्यापासून वेगळं होऊन स्वतःचा गट स्थापन केला आणि भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) सोबत महायुतीत सामील झाले. या निर्णयामुळे कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली. शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर, अजितदादांनी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नाव आणि चिन्ह मिळवलं. शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस (एससीपी) स्थापन करण्यास भाग पाडण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली असली तरी, पवार कुटुंबियांचे संबंध अबाधित राहिले.
ADVERTISEMENT











