Loudspeaker Row : मुंबईतील २६ मशिदींच्या इमामांचा निर्णय! सकाळची नमाज भोंग्याशिवाय

मुंबई तक

• 02:42 AM • 05 May 2022

राज्यात भोंग्याचा वाद सुरू असून, मुंबईतील २६ मशिदींच्या इमामांनी सकाळची नमाजसाठी भोंगा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री दक्षिण मुंबईत जवळपास २६ मशिदींच्या इमामांची बैठक झाली. या बैठकीत भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या इमामांची बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आदेशानुसार सकाळची नमाज भोंग्यांशिवाय करण्याचा […]

Mumbaitak
follow google news

राज्यात भोंग्याचा वाद सुरू असून, मुंबईतील २६ मशिदींच्या इमामांनी सकाळची नमाजसाठी भोंगा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्री दक्षिण मुंबईत जवळपास २६ मशिदींच्या इमामांची बैठक झाली. या बैठकीत भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली.

हे वाचलं का?

दक्षिण मुंबईतील २६ मशिदींच्या इमामांची बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आदेशानुसार सकाळची नमाज भोंग्यांशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुन्नी बडी मशिदमध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीला भायखळातील मदनपुरा, नागपाडा आणि अग्रीपाडा भागातील मशिदींचे इमाम उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत या भोंग्यावरून अजान केली जाणार नाही. मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत या निर्णयाचं पालन केल्याचं दिसलं. मशिदीत आज सकाळची नमाज भोंग्याशिवाय झाली.

मुंबई पोलीस आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मशिदींवरील भोंग्यांचं आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस आयुक्त हद्दीतील सर्व धर्मांच्या धर्मगुरूंची बुधवारी बैठक घेतली. तक्रार आल्यास कारवाई करू, असा इशारा आयुक्तांनी या बैठकीत दिला.

भोंग्यावरून मोठ्या आवाजात अजानचा आवाज आल्यास त्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा राज ठाकरे यांच्याकडून सातत्यानं दिला जात आहे. बुधवारीही राज ठाकरे यांनी भूमिकेवर कायम असून, भोंगे हटवेपर्यंत आणि नियमांची अंमलबजावणी करेपर्यंत सुरूच राहिलं, असं म्हणाले.

मनसेकडून होत असलेल्या मागणीनंतर बुधवारी दुपारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील सर्वच धर्मगुरूंची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी सर्वांनाच आवाज ५५ डेसिबलपेक्षा कमी ठेवण्याचं आवाहन केलं. ‘भोंग्यासंदर्भात जे नियम आहेत, त्यांचं पालन करण्यात यावं आणि भोंगे लावण्यासाठी परवानगी घेण्यात यावी, असं आयुक्तांनी सांगितलं,’ अशी माहिती मुंबा देवी मंदिराचे हेमंत जाधव यांनी दिली.

‘सध्या आम्ही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाहीये, पण भोंग्यांच्या मोठ्या आवाजाबद्दल तक्रारी आल्या तर आम्ही त्याविरुद्ध कारवाई करू. भोंगा/लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक असेल. एका वेळी तीन महिन्यांसाठीच परवानगी मिळेल,’ असंही आयुक्तांनी या बैठकीत सांगितलेलं आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण २,४०० मंदिरं आहेत. यापैकी २४ मंदिरांनी भोंगे लावण्याची परवानगी घेतलेली आहे. त्यांना ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज ठेवू नका, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुंबईत एकूण १,१४४ मशिदी आहेत, ज्यापैकी आतापर्यंत ९४४ मशिदींनी भोंगा लावण्याची परवानगी मागितलेली आहे. त्यात ९२२ मशिदींना तशी परवानगी देण्यात आलेली आहे. आता सर्वच धर्मस्थळांना भोंगा लावण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे.

एका महिन्यासाठीच परवानगी दिली जाईल. त्यानंतर पुन्हा परवानगी घ्यावी लागेल. कांदिवली आणि चारकोपमध्ये मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणात पोलीस गुन्हा दाखल केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पुढच्या काळात वाहन निर्माता कंपन्या, बिल्डर्स, बांधकाम करणाऱ्या कंपन्यांसोबत बैठक घेतली जाईल आणि ध्वनि प्रदूषण कमी करण्यासंदर्भात त्याच्यासोबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

    follow whatsapp