भाजपशी युती हाच पर्याय ! संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांच्या भूमिकेत कमालीचा बदल

मुंबई तक

• 07:23 AM • 16 Sep 2021

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहीलेल्या लेखाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुकांसाठी खेडेकर यांनी भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमीत्त मराठा मार्ग या मासिकात हा लेख खेडेकरांनी लिहीला आहे. १ सप्टेंबर […]

Mumbaitak
follow google news

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरुद्ध भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहीलेल्या लेखाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुकांसाठी खेडेकर यांनी भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमीत्त मराठा मार्ग या मासिकात हा लेख खेडेकरांनी लिहीला आहे.

हे वाचलं का?

१ सप्टेंबर १९९३ रोजी अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना झाली. यानंतर मराठा समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक आणि आग्रही भूमिका घेणारी संघटना म्हणून मराठा सेवा संघाकडे पाहिलं जातं. संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ नेहमी RSS-भाजपविरोधी भूमिका घेऊन मैदानात उतरल्याचं सर्वांना माहिती आहे. मात्र पुरुषोत्तम खेडेकर यांची पत्नी रेखाताई खेडेकर या भाजपच्या आमदार होत्या.

मात्र असं असतानाही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजप आणि संघविरोधी भूमिका जाहीरपणे घेतली होती. तत्कालीन सरसंघचालक के.सुदर्शन यांच्यावर चप्पल भिरकावणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याचाही खेडेकर यांनी सत्कार केला होता. भारतीय जनता पक्ष हा संघाच्या विचारधारेचा पक्ष आहे. विशेष म्हणजे मराठा सेवा संघाची संपूर्ण मांडणी ही आरएसएस विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहे. मात्र तरीही पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा विचार मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचं पिल्लू आहे अशा प्रकारे अनेक वर्षे आमची हेटाळणी देखील झाली. पण आता वेळ आलीय ती काहीतरी भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा विचार करावा, असं खेडेकर म्हणाले. खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती का करावी लागेल, याचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. राजकारणात सध्या युती आघाड्यांचा काळ आहे, हे फक्त आपल्या राज्यात आहे, असं नाहीय. तर देशभरातही आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या. परंतू मोजक्या संस्था वगळल्या तर लोकसभा-विधानसभेत संभाजी ब्रिगेडची पाटी कोरीच राहिली. “काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पर्याय आमच्यासमोर जवळपास नाहीच आहे. आता भाजपचा पर्याय उरला आहे. राजकारण हे राजकारणासारखं करण्यासाठी आता एकमेव भाजपचा पर्याय दिसतो आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो पर्याय तपासून पाहावा. दोघांनीही चर्चेअंती अजेंडा ठरवावा आणि पुढचं राजकारण करावं”, असं पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.

    follow whatsapp