–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
नागपूर शहरात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. कायद्याच्या रक्षकानेच लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी पोलीस अधिकारी याचं नाव प्रदीप श्रीकृष्ण नितवणे असं असून तो नक्षल विरोधी अभियान कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळतो.
पीडित मुलगी अल्पवयीन असून, ती शिक्षणासाठी शहरातील एका ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तिचे वडील हे खासगी कंपनीत काम करतात. पीडित तरुणीच्या घरच्यांचे आणि आरोपीचे कौटुंबिक संबंध होते.
मुलगी बाहेर शिकायला असल्याने तिच्या घरच्यांनी प्रदीपला तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलेलं होतं. याचाच फायदा प्रदीपने घेतला. एकेदिवशी तो तिच्या पेईंग रूमवर पोहचला आणि आपल्याला बाहेर जायचं आहे, असं सांगितलं.
कौटुंबिक संबंध असल्याने घर मालकाने आणि तरुणीने देखील जास्त विचार केला नाही.
दारू पाजून बेशुद्ध अवस्थेत केले दुष्कृत्य
प्रदीपने खासगी वाहनातून तिला अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे नेले. तिथे तिला बेशुद्ध करण्याचे औषध दिले, सोबतच दारू देखील पाजली. तशा अवस्थेत नराधम पोलीस अधिकाऱ्याने अल्पवयीन तरुणीवर दुष्कृत्य केले. त्याचबरोबर कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. भेदरलेल्या अवस्थेत पिडीत तरुणीने नागपूरला पोचल्यानंतर सर्व हकीगत आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर तिच्या पालकांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीच्याअनुसार आरोपी प्रदीपच्या विरोधात भारतीय दंड विधान 363, 376 आणि 328 पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सीताबर्डी पोलिसांनी नराधम पोलीस अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत. कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानेच अल्पवयीन मुलीवर दुष्कृत्य केल्याने नागपुरात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आता शहरातून जोर धरत आहे.
ADVERTISEMENT
