Russia – Ukraine Conflict : युद्धाला सुरुवात, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?

मुंबई तक

• 09:51 AM • 24 Feb 2022

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात अखेरीस ठिणगी पडलीच आहे. युक्रेनमधील पुर्वेकडच्या दोन भागांना रशियाने स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिल्यानंतर युक्रेनच्या काही भागांमध्ये रशियाने सैन्य उतरवलं आहे. युक्रेनच्या डोन्बास प्रांतात रशियाने लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे. अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांनी रशियाच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अनेक देश […]

Mumbaitak
follow google news

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात अखेरीस ठिणगी पडलीच आहे. युक्रेनमधील पुर्वेकडच्या दोन भागांना रशियाने स्वतंत्र राष्ट्राची मान्यता दिल्यानंतर युक्रेनच्या काही भागांमध्ये रशियाने सैन्य उतरवलं आहे. युक्रेनच्या डोन्बास प्रांतात रशियाने लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे. अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांनी रशियाच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस अनेक देश या युद्धात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जाणून घेऊयात आतापर्यंत या दोन देशांमधील संघर्षाचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणावर कसे-कसे उमटत गेले.

हे वाचलं का?

युक्रेनमधील लष्करी कारवाईचं पुतीन यांच्याकडून समर्थन –

युक्रेनमधील पुर्व भागातल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी लष्करी कारवाई योग्यच असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं. परंतू आपल्या लष्करी कारवाईचं समर्थन करण्यासाठी रशिया हे खोटं कारण देत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. रशियातील राष्ट्रीय वाहिनीवरुन जनतेशी संवाद साधत असताना पुतीन यांनी अमेरिका आणि अन्य सहयोगी देशांवर टीका करताना, युक्रेनला NATO देशांच्या समुहात प्रवेश देण्याबद्दल रशियाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं म्हटलं आहे. युक्रेनवर ताबा मिळवणं हे आमचं कधीच लक्ष्य नसल्याचं पुतीन यावेळी म्हणाले. यावेळी बोलत असताना पुतीन यांनी युक्रेनच्या सैनिकांना तात्काळ शस्त्र खाली टाका आणि घरी जा असा सूचक इशारा दिला आहे.

India Ukraine Business: युक्रेन भारताकडून ‘या’ वस्तू करतो खरेदी, युद्ध झालं तर..?

अमेरिका आणि अन्य देशांना इशारा देताना पुतीन म्हणाले, “जे देश यामध्ये उतरु इच्छित आहेत त्यांना मला काही सांगायचं आहे. जर कोणत्याही देशाने आमच्या मार्गात येण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आमच्या देशाला आणि लोकांना त्याचा त्रास झाला तर रशिया त्याला तितकचं कठोर प्रत्युत्तर देईल. ज्याचे परिणाम तुम्ही इतिहासात आतापर्यंत पाहिलेही नसतील.” पुतीन यांनी इशारा दिल्यानंतर युक्रेनमध्ये ओडेसा आणि खारकीव्ह प्रांतात दोन मोठे स्फोट झाल्याची माहिती AP या वृत्तसंस्थेने दिली आहे,

युक्रेनमध्ये अडकलेले 200 हून जास्त भारतीय मायदेशी परतले

रशियाने केलेल्या हल्ल्याचा अमेरिका आणि NATO देशांकडून निषेध –

रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर साहजिकच जागतिक राजकारणात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेसह अन्य NATO देशांनी रशियाचा निषेध करताना युक्रेनवरील झालेला हल्ला हा असमर्थनीय असल्याचं म्हटलं आहे. “पुतीन यांनी पुर्वनियोजीत युद्धाचा मार्ग स्विकारला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होताना दिसेल. अमेरिका आणि आमचे सहयोगी देश याला सडेतोड प्रत्युत्तर देतील. या हल्ल्यासाठी जग रशियाला कायम जबाबदार धरेल”, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केलं आहे.

युद्धासोबतच फ्लर्टही! रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवत आहेत असे मेसेज

NATO चे Secretary-General जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी, “रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणारा असून ज्यामुळे युरोपातील इतर अन्य देशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.” आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेचा मार्ग स्विकारला जावा यासाठी प्रयत्न करत होतो. परंतू रशियाने एका सार्वभौम देशाविरुद्ध लष्करी कारवाईचा पर्याय निवडल्याचं स्टोल्टनबर्ग यांनी सांगितलं.

Ukraine-Russia war : युद्धाला तोंड फुटलं! युक्रेनवर लष्करी कारवाईची पुतिन यांची घोषणा

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून शांततापूर्व चर्चेसाठी विनंती –

रशियाने केलेल्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डमायर झेलेन्स्की यांनी गुरुवारी रशियन भाषेत संवाद साधत या विषयावर शांततापूर्ण चर्चेची मागणी केली होती. परंतू यानंतरही पुतीन यांनी हल्ल्याचा मार्ग स्विकारला आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष : “…तर ४४ मिलियन पुरूष, महिला अन् मुलाचं लक्ष्य युद्ध लढणंच असेल”

“युक्रेनच्या जनतेला आणि सरकारला शांतता हवी आहे. जर आमच्यावर हल्ला झाला, जर आमचा देश आमच्या ताब्यातून कोणी हिसकावून घेत असेल, आमचं स्वातंत्र्य, आमची शांतता, आमच्या मुलांचं भविष्य हिरावलं जाणार असेल तर आम्ही याविरुद्ध मैदानात उतरु. तुम्ही जेव्हा हल्ला कराल तेव्हा तुम्हाला आमचे चेहरे दिसतील, आम्ही पाठ दाखवून हार मानणार नाही.” झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यासोबत बुधवारी फोनवर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. परंतू रशियाने याला प्रतिसाद दिला नाही. सध्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेन सरकारने संपूर्ण देशभरात आणीबाणी घोषित केली आहे. ज्यात सरकारी यंत्रणांना लोकांना घराबाहेर फिरण्यापासून, मोर्चे, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

युक्रेनच्या पुर्वेकडील भागाचे दोन तुकडे, रशियाकडून स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता

पुतीन यांच्या घोषणेनंतर UN SECURITY COUNCIL ने बोलावली तातडीची बैठक –

पुतीन यांनी युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर संभाव्य धोका लक्षात घेत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तात्काळ महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख अँटेनियो गटर्स यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना विनंती करत, “तुमच्या सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखा. शांतातपूर्वक चर्चेला एकदा संधी देऊन पाहा. आतापर्यंत या संघर्षात अनेकांचा जीव गेला आहे. माणुसकीच्या भावनेतून तुम्ही रशियाचं लष्कर युक्रेनमधून मागे बोलवा”, अशी मागणी केली.

रशिया आणि युक्रेनच्या संघर्षात युक्रेनची मदार पश्चिमी देशांच्या मदतीवर –

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या लष्करी संघर्षात रशियाचं सामर्थ्य हे युक्रेनपेक्षा कित्येक पटीने मोठं आहे. त्यामुळे पश्चिमेकडील देशांनी रशियावर अधिक निर्बंध घालावेत यासाठी युक्रेन प्रयत्नशील राहिल. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री डीमायट्रो कुलेबा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर, पाश्चिमात्य देशांनी रशियाला ज्याचा सर्वाधिक फटका बसेल अशा ठिकाणी प्रहार करणं गरजेचं आहे, असं म्हटलं.

अमेरिकेने रशिया आणि जर्मनी या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या गॅस पाईपलाईनचं बांधकाम थांबवलं आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यासाठी गॅसचा वापर करु नये यासाठी अमेरिका आणि जर्मनी यांनी हे पाऊल उचललं आहे. जर्मनीने अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर मंगळवारीच पाईपलाईनचं बांधकाम स्थगित करत असल्याचं जाहीर केलं. याव्यतिरीक्त अन्य देशांनीही रशियावर निर्बंधांची घोषणा केली आहे. रशियन सैन्याने जर युक्रेनमधील फुटीरतावादी गटाच्या अधिपत्याखाली असलेला प्रांत ओलांडला तर युरोपच्या जमिनीवर आतापर्यंतचं सर्वात मोठं युद्ध होईल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.

रशियन सैन्याच्या लष्कराच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित बँकींग व्यवहारावर ब्रिटीश सरकारने निर्बंध घातले आहेत. रशियाने जर युक्रेनवरचा हल्ला थांबवला नाही तर यापुढे आणखी निर्बंध लादले जातील असं ब्रिटीश फॉरेन सेक्रेटरी लिझ ट्रस यांनी सांगितलं. याव्यतिरीक्त अमेरिका आणि अन्य युरोपियन देशांनी रशियाच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आहे.

दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर काय होऊ शकतो परिणाम?

दोन्ही देशांमधील संघर्षामुळे सध्या युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला याचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. एकामागोमाग एक युक्रेनची राजधानी Kyiv मधील इतर देशांच्या Embassy आणि अन्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं बंद व्हायला लागली आहेत. युद्धाचे ढग जमा झाल्यामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली असून गेल्या आठवडाभराच्या काळात युक्रेनमधील अनेक गुंतवणुकीवर याचा मोठा परिणाम झालेला पहायला मिळतो आहे. अनेक तज्ज्ञांनी रशिया युद्धजन्य परिस्थिती निर्माण करुन युक्रेनची अर्थव्यस्था डामाडौल करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही म्हटलं आहे.

रशिया युक्रेन युद्धाचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स 1458 तर निफ्टी 387 अंकांनी कोसळला

    follow whatsapp