विधानपरिषद निवडणूक : सतेज पाटलांनी अनेकांच्या कळा काढल्या, निकालात परिणाम दिसेल – धनंजय महाडीक

मुंबई तक

• 01:28 PM • 22 Nov 2021

आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे भाजपसोबत असल्यानं, विधानपरिषद निवडणुकीत अमल महाडिक यांचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. सतेज पाटील यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत अनेकांच्या कळा काढल्यानं, त्याचे परिणाम निवडणूक निकालातून दिसतील, अशी खात्री भाजप प्रवक्ते आणि सतेज पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी धनंजय महाडीक यांनी दिली आहे. आगामी विधानपरिषद […]

Mumbaitak
follow google news

आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे भाजपसोबत असल्यानं, विधानपरिषद निवडणुकीत अमल महाडिक यांचा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. सतेज पाटील यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत अनेकांच्या कळा काढल्यानं, त्याचे परिणाम निवडणूक निकालातून दिसतील, अशी खात्री भाजप प्रवक्ते आणि सतेज पाटलांचे कट्टर प्रतिस्पर्धी धनंजय महाडीक यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी आज कोल्हापुरातून भाजप उमेदवार अमल महाडीक यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला.

विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीने परत आणता येतं – चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

अर्ज भरण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी महाडिक यांच्या विजयाचा विश्‍वास व्यक्त केला. गेल्या वेळी विधानपरिषद निवडणुकीची समीकरणं वेगळी होती. यंदा आमदार प्रकाश आवाडे आणि विनय कोरे हे जिल्ह्यातील दिग्गज नेते भाजपसोबत आहेत. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या १०५ नगरसेवकांसह मित्र पक्षांचे ६० नगरसेवक आपल्यासोबत आहेत. विजयासाठी आवश्यक असणारी ४३ मतं मिळवणं अवघड नाही. राजकीय भवितव्य जाणणार्‍या मतदारांनी वेळीच भाजपसोबत यावं. मॅजिक फिगर गाठून आम्ही निवडणुकीत नक्की यश मिळवणार, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी विजयाचं गणित मांडताना कॉंग्रेसकडं त्यांच्या चिन्हावर निवडून आलेले केवळ ३६ मतदार असल्याचं सांगितलं. सतेज पाटील यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत अनेकांच्या कळा काढल्या आहेत. ते सर्वजण आता निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. त्याचा परिणाम नक्की निवडणुकीच्या निकालात दिसेल. विरोधकांकडून जुने व्हिडिओ व्हायरल करून, मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता त्यांची बंगाली जादू उपयोगाला येणार नाही. जिल्ह्यात काही लोकांना मंत्री व्हायचंय, तर काहींना पालकमंत्री व्हायचंय. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसणार असून, भाजपचे उमेदवार अमल महाडिक मोठ्या मताधिक्क्यानं विजयी होतील असा आत्मविश्वास धनंजय महाडीक यांनी व्यक्त केलाय.

अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, जयंत पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, अरुण इंगवले, अशोकराव माने उपस्थित होते.

काँग्रेसचं ‘मिशन नागपूर’! भाजपचा बालेकिल्ला फोडण्यासाठी संघ स्वयंसेवकाला घेतलं पक्षात

    follow whatsapp