थोरात-तांबे संघर्षाची सुरुवात? अहमदनगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता

मुंबई तक

12 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:17 AM)

Satyajeet Tambe file nomination for MLC: नाशिक : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आता थोरात विरुद्ध तांबे या संघर्षाची सुरुवात झाली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याच कारण ठरलं आहे ते विधानपरिषदेची नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक! नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर बोलताना […]

Mumbaitak
follow google news

Satyajeet Tambe file nomination for MLC: नाशिक : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आता थोरात विरुद्ध तांबे या संघर्षाची सुरुवात झाली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याच कारण ठरलं आहे ते विधानपरिषदेची नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक!

हे वाचलं का?

नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यानंतर बोलताना त्यांनी आपण सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार असून त्यांच्याकडे पाठिंबाही मागणार आहोत, असं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, रासप, मनसे या सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या बाजूला भाजपनेही इथून कोणत्याच उमेदवाराला एबी फॉर्म दिलेला नाही.

खरं तर, नाशिक पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आला होता. इथले विद्यमान सदस्य डॉ. सुधीर तांबे हेही काँग्रेसचे होते. ते मागील तीन टर्म या मतदारसंघाच प्रतिनिधीत्व करत आहेत, त्यामुळे काँग्रेससाठी ही हक्काची निवडून येणाऱ्या जागांपैकी गणली जाणारी एक जागा आहे. अशा परिस्थितीतही या मतदारसंघात काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारच जाहीर केला नव्हता.

सत्यजीत तांबेंना बाळासाहेब थोरातांचा विरोध?

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने अखेरपर्यंत इथून उमेदवारी जाहीर न करण्याच कारण म्हणजे सत्यजीत तांबे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. अगदी २०१७ म्हणजे गत पदवीधर निवडणुकीत देखील ते इथून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र काँग्रेसच्या अंंतर्गत राजकारणातून तांबे यांना खुद्द काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाच विरोध होता. यंदाही हा विरोध कायम होता, मात्र यावेळी हा विरोध बाजूला ठेवून सत्यजीत तांबे यांनी थेट दिल्लीतून तिकिटासाठी प्रयत्न सुरु केल्याचं बोललं जात होतं.

तांबेंनीही केली होती तयारी…:

त्यामुळे अखेरपर्यंत सुधीर तांबे की सत्यजीत तांबे ही चर्चा सुरु राहिली. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनीही दोन फॉर्म तयार ठेवले होते. एक फॉर्म काँग्रेसच्या वतीने भरलेला तर दुसरा फॉर्म हा अपक्ष म्हणून भरण्यात आला होता. ही चर्चा सुरु असतानाच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या तासात काँग्रेसने अचानक डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी जाहीर केली.

काँग्रेसने सुधीर तांबेंना निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर सुधीर तांबे यांनी माघार घेतली, पक्षादेश धुडकावला आणि सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली. त्यामुळे आता सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून दिसणार आहेत. दरम्यान, यामुळेच आता तांबे विरुद्ध थोरात अशा संघर्षाची ठिणगी पडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सत्यजीत तांबेंना भाजपचाही पाठिंबा?

या सगळ्या घडामोडी एका बाजूला सुरु असताना दुसऱ्या बाजूला भाजपनेही इथून कोणालाच एबी फॉर्म दिला नाही. अखेरपर्यंत भाजपने अधिकृत उमेदवारही जाहीर केला नाही. राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून भाजप अहमदनगरच्या एका बड्या राजकीय घराण्यातील युवा नेत्याला विधानपरिषदेसाठी पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. हे युवा नेते सत्यजीत तांबेंच आहेत का? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबेंच्या सिटीझनविल पुस्तकाचा अनुवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी फडणवीसांनी तांबेंना मामा बाळासाहेब थोरातांसमोरच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. 

फडणवीस म्हणाले होते, ‘खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात. जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात’.

त्यामुळे आता भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष्य लागलं आहे. त्यातच विखे पाटील यांनीही सत्यजीत तांबे यांना पक्षाने सांगितलं तर पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. सत्यजितशी माझं अद्याप बोलणं झालेलं नाही. पण पक्षाने जर त्यांना पाठिंबा जाहीर केला तर आम्ही त्यांच्यासाठीही काम करु, असं विखे पाटील म्हणाले आहेत.

    follow whatsapp