यवतमाळ : धक्कादायक ! मुलगी झाली म्हणून भावाच्या बायकोला जाळलं, उपचारादरम्यान मृत्यू

सख्ख्या भावालाही मुलगी झाल्यामुळे आता आपल्या मुलीचे लाड कोणी करणार नाही म्हणून भावाच्या बायकोला नणंदेने ऑईल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळ मधील पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी गावात हा प्रकार घडला आहे. मोनिका गणेश पवार असं मृत महिलेचं नाव आहे. सहा वर्षांपूर्वी मोनिका आणि गणेश यांचं लग्न झालं होतं. दोघांनाही एक मुलगा होता […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:24 AM • 19 Jul 2021

follow google news

सख्ख्या भावालाही मुलगी झाल्यामुळे आता आपल्या मुलीचे लाड कोणी करणार नाही म्हणून भावाच्या बायकोला नणंदेने ऑईल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळ मधील पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी गावात हा प्रकार घडला आहे. मोनिका गणेश पवार असं मृत महिलेचं नाव आहे.

हे वाचलं का?

सहा वर्षांपूर्वी मोनिका आणि गणेश यांचं लग्न झालं होतं. दोघांनाही एक मुलगा होता आणि संसार सुखाचा सुरु होता. यानंतर मोनिकाला पुन्हा दिवस गेले, ६ जुलैला मोनिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरात मुलीचा जन्म झाल्यामुळे पवार कुटुंब आनंदात होतं. परंतू मोनिकाची नणंद कांता राठोड आता आपल्या मुलीचे घरात कोणीही लाड करणार नाही या गैरसमजुतीमधून नाराज झाली होती. त्यातूनच तिने मोनिकाला त्रास द्यायला सुरुवात केली.

८ जुलैला दुपारी मोनिका बाथरुममधून बाहेर येत असताना नणंद कांता राठोडने तिला ऑईल टाकून पेटवून दिलं. या प्रकारात मोनिकाला चांगल्या जखमा झाल्या. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी मोनिकाला तात्काळ उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात हजर केलं. परंतू उपचारादरम्यान १८ जुलै ला मोनिकाने अखेरचा श्वास घेतला. या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकारानंतर मोनिकाच्या घरच्यांनी तिची नणंद कांता राठोडविरुद्ध पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत कांता राठोडवर हत्येचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. मयत मोनिका आणि गणेश यांचा संसार सुखाचा सुरु होता. दोघांनाही एक सहा वर्षाचा मुलगा होता. मुलीच्या जन्मानंतर अवघ्या १२ दिवसांमध्येच मोनिकाने अखेरचा श्वास घेतल्यामुळे ही दोन्ही लहान मुलं आईच्या मायेला पारखी झाली आहेत.

    follow whatsapp