Mumbai News: मुंबईतील प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वांद्रे रेल्वे स्थानक आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) ऑफिस दरम्यान बनलेल्या स्कायवॉकचं काम अखेर पूर्ण झालं आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा प्रवाशांसाठी ते अद्याप खुलं करण्यात आलेलं नाही. हायकोर्टाच्या निर्देशानुसार, डिसेंबरच्या अखेरीस हा स्कायवॉक प्रवाशांसाठी खुला करण्याची महापालिकेची योजना होती. परंतु, बीएमसी निवडणूक आचारसंहितेमुळे उद्घाटन किंवा लोकार्पण समारंभ झाला नाही.
ADVERTISEMENT
प्रवाशांना दिलासा
वांद्रे पूर्व आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात भरपूर सरकारी, निम-शासकीय आणि खाजगी ऑफिस आहेत. म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) सारख्या महत्त्वाच्या कार्यालयांत दररोज मोठ्या संख्येने लोक येत असतात. मात्र, स्कायवॉक नसल्यामुळे लोकांना अरुंद आणि धोकादायक फूटपाथवरून चालावं लागतं आणि यामुळे अपघातांचा सतत धोका असतो. जर स्कायवॉक सुरू झाला तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात सुटेल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
खरं तर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने लोकांची गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी 2008 ते 2009 मध्ये हा स्कायवॉक बनवला होता आणि नंतर तो महापालिकेकडे ट्रान्सफर करण्यात आला. कालांतराने, हा स्कायवॉक धोकादायक झाल्याचं दिसून आलं. त्यासाठी महापालिकेने हा स्कायवॉक पुन्हा बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या स्कायवॉकच्या कामात विलंब झाल्याने हायकोर्टात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली.
हे ही वाचा: Govt Job: फक्त एक मुलाखत अन् थेट प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट व्हा... 'या' सरकारी रिसर्च सेक्टरमध्ये निघाली भरती!
कोर्टाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि महापालिकेला निश्चित कालावधीत स्कायवॉकचं काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. सुरूवातीला या प्रोजेक्टच्या कामासाठी 15 महिन्यांची डेडलाइन देण्यात आली, मात्र याचं पालन न झाल्यामुळए कोर्टाने महापालिकेला हे काम 10 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि मार्च 2024 मध्ये याचिका निकाली काढली. अखेर, या स्कायवॉकचं काम पूर्ण झालं असून आता त्याच्या उद्घाटनात अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
खरं तर, नियमांनुसार आचार संहितेच्या काळात या स्कायवॉकचं उद्घाटन केलं जाऊ शकत नाही. मात्र, पब्लिक यूटिलिटी प्रोजेक्ट हा कोणत्याही कार्यक्रमाशिवाय नागरिकांसाठी खुला केला जाऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अद्याप, प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसून निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच हा स्कायवॉक खुला होणार असल्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











