Stuti Sonawane Suicide Case : मुंबईतील अॅन्टोप हिल परिसरात एका तरुण महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. स्तुती सोनावणे असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर फैजुल मोहम्मद खान याला बेड्या ठोकल्या आहेत. स्तुतीने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सहा पानांची सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिने फैजुलवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
वाढदिवसानंतर बदलले प्रियकराचे वागणे
मिळालेल्या माहितीनुसार, स्तुती आणि फैजुल यांची ओळख एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून झाली होती. कायद्याचे शिक्षण घेतलेला आणि इन्सुरन्स एजंट म्हणून कार्यरत असलेला फैजुल सुरुवातीला स्तुतीशी अतिशय प्रेमाने वागत होता. त्याने तिचा वाढदिवसही आलिशान ताज हॉटेलमध्ये साजरा केला होता. मात्र, काही काळानंतर त्याच्या वागण्यात कमालीचा बदल झाला. तो वारंवार तिचा अपमानकारक शब्दांत छळ करू लागला. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून स्तुतीने राहत्या घरात दुपट्ट्याने गळफास घेतला.
हेही वाचा : नागपूर: आचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी 6 महिन्यांनंतर जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर, चौघांना अटक
पालकांना दुसऱ्या दिवशी लागला सुगावा
8 मार्च रोजी रात्री स्तुतीचे पालक बाहेर जेवायला गेले असताना तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. रात्री उशिरा पालक परतले तेव्हा खोलीचा लाईट सुरू असल्याने ती अभ्यास करत असावी असे त्यांना वाटले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी दरवाजा तोडला आणि समोर मुलीचा मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्तुतीचे वडील बजरंग सोनावणे यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना व्यक्त केली आहे.
पोलिसांनी फेटाळला 'लव्ह जिहाद'चा दावा
या प्रकरणाच्या संदर्भात काही चर्चांना उधाण आले असताना, मुंबई पोलिसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तपासादरम्यान आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा 'लव्ह जिहाद'चा अँगल आढळून आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण प्रामुख्याने नात्यातील कलह आणि मानसिक छळाशी संबंधित असल्याचे दिसून येते. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस या घटनेतील प्रत्येक पुराव्याची बारकाईने तपासणी करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











