मुंबई : कुर्ल्यात गँगवार, आधी गोळ्या घातल्या अन् नंतर धारदार शस्त्रांनी वार; बाबा पवारला भररस्त्यात संपवले

मुंबईतील कुर्ला येथे काल संध्याकाळी भररस्त्यात अंदाधुंद गोळाबाराची घटना घडली. गोळ्यांच्या आवाजाने आणि आरडाओरड्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Mumbai Crime

Mumbai Crime

मुंबई तक

• 09:26 AM • 30 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : कुर्ल्यात गँगवार

point

आधी गोळ्या घातल्या अन् नंतर धारदार शस्त्रांनी वार

point

बाबा पवारला भररस्त्यात संपवले

Mumbai Crime : मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील 'हलाओ पूल' परिसरात बुधवारी (29 एप्रिल) संध्याकाळी भररस्त्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असतानाच, अज्ञात हल्लेखोरांनी बाबा यलप्पा पवार नावाच्या व्यक्तीवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्यांच्या आवाजाने आणि आरडाओरड्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोर केवळ गोळीबार करूनच थांबले नाहीत, तर बाबा पवार याच्यावर धारदार शस्त्रांनीही अनेक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबा पवारला तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

गोळीबार अन् शस्त्रांनी वार

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या म्हणजे एक सुनियोजित कट असण्याची दाट शक्यता आहे. ज्या पद्धतीने बाबा पवारवर गोळीबार आणि शस्त्रांनी वार करण्यात आले, त्यावरून आरोपींच्या मनात प्रचंड द्वेष आणि दहशत निर्माण करण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेनंतर कुर्ला परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून स्थानिक पोलिसांसह अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

हे ही वाचा : पार्टी, हत्या आणि 300 सीसीटीव्ही; टिटवाळ्यात नदीजवळ काय घडलं?

जुन्या वैमनस्यातून हत्येचा संशय

मृत बाबा यलप्पा पवार याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास केला असता, त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्याचा भूतकाळ पाहता, ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोघांच्या चौकशीतून हत्येचे नेमके कारण आणि मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

हे ही वाचा : काँग्रेससाठी खूपच मोठी Good News.. 'इथे' येणार त्यांची सत्ता, कोण होणार मुख्यमंत्री?

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर

या भीषण हत्याकांडातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस हलाओ पूल आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासत आहेत. सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोरांच्या हालचाली कैद झाल्या असाव्यात, असा विश्वास पोलिसांना आहे. या घटनेने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.