पार्टी, हत्या आणि 300 सीसीटीव्ही; टिटवाळ्यात नदीजवळ काय घडलं?

अवघ्या 700 रुपयांच्या वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी योगेश कदम याला अटक करण्यात आली आहे.

Titvala Crime

Titvala Crime

मिथिलेश गुप्ता

30 Apr 2026 (अपडेटेड: 30 Apr 2026, 09:46 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

टिटवाळा : 700 रुपयांसाठी मित्राला संपवले

point

दगडाने ठेचून केली हत्या

Titvala Crime : कल्याण तालुक्यातील खडवली परिसरात घडलेल्या हत्येच्या प्रकरणाचा टिटवाळा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. अवघ्या 700 रुपयांच्या वादातून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी योगेश कदम याला अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी खडवली नदी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. 

हे वाचलं का?

300 सीसीटीव्ही फुटेज तपासले

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नितीन मुदगुण, महेश कदम तसेच ठाणे एसीबीचे भाऊसाहेब गायकवाड आणि जयवंत वारे यांच्या पथकाने तपास हाती घेतला. तपासादरम्यान श्वान पथकाची मदत घेण्यात आली. श्वानाने घटनास्थळावरून थेट खडवली रेल्वे स्थानकापर्यंत मार्ग दाखवला. त्यानंतर पोलिसांनी खडवली ते मुंबईपर्यंत सुमारे 300 सीसीटीव्ही फुटेज तपासले.

हे ही वाचा : काँग्रेससाठी खूपच मोठी Good News.. 'इथे' येणार त्यांची सत्ता, कोण होणार मुख्यमंत्री?

700 रुपये चोरल्याचा संशय अन् दगडाने ठेचले डोके

या तपासातून आरोपीच्या संपर्कातील एका व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताची ओळख राजेश प्रभुळकर अशी पटली, तर आरोपी योगेश कदम असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही केटरिंगचे काम करत होते आणि एकमेकांचे जवळचे मित्र होते. पोलिस तपासात उघड झाले की, दोघे खडवली नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पार्टी केली होती. दरम्यान, योगेश कदम याला संशय आला की त्याच्या पैशांपैकी 700 रुपये राजेश प्रभुळकर याने चोरले. या संशयावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाच्या भरात योगेश कदम याने दगडाने ठेचून राजेश प्रभुळकर याची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.

हे ही वाचा : महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करताच काँग्रेसची मोठी घोषणा

आरोपी होता वाँटेड

दरम्यान, तपासात असेही उघड झाले की आरोपी योगेश कदम हा मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या प्रकरणात वाँटेड होता. त्याच्यावर आणखी एक गंभीर गुन्हाही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. टिटवाला पोलीस पुढील तपास करत आहेत.