Nagpur Crime : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नवरगाव परिसरात एका ढाब्यावर घडलेली धक्कादायक घटना तब्बल सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. ढाब्यावर काम करणाऱ्या एका आचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर, ही बाब पोलिसांपासून लपवण्यासाठी त्याचा मृतदेह ढाब्याच्या आवारातच जमिनीत गाडण्यात आला होता. या प्रकरणाची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संबंधित ठिकाणी उत्खनन केले. या कारवाईत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हाती लागला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
प्रताप सिंह महादेव सिंह बैंस उर्फ ठाकूर असे मृताचे नाव असून, तो नवरगाव सीमेवर असलेल्या एका प्रसिद्ध टूरिस्ट ढाब्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य आचारी म्हणून काम करत होता. साधारण सहा महिन्यांपूर्वी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्याने दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा ढाबा कर्मचाऱ्यांमध्ये होती. मात्र, नियमानुसार पोलिसांना या घटनेची माहिती देणे आवश्यक असताना, ढाब्यावरील काही कर्मचाऱ्यांनी ही बाब दडवून ठेवली. कोणताही पुरावा मागे न ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह ढाब्याच्या मागील मोकळ्या जागेत नेऊन जमिनीत गाडून टाकला.
हेही वाचा : अखेर 30 वर्षानंतर योग आला! शुक्र आणि शनीची दुर्मिळ युती, 'या' चार राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार
गुप्त माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई
अनेक महिने हे प्रकरण दाबले गेले होते, मात्र नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला या भीषण कृत्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेत रामटेक पोलीस आणि ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या नवरगाव गाठले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयास्पद जागेचे खोदकाम करण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना जमिनीखाली पुरलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून हा सांगाडा आणि अवयव उत्खनन करून बाहेर काढले. प्राथमिक तपासाअंती हा मृतदेह प्रताप सिंह यांचाच असल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील वैद्यकीय चाचणीसाठी तो नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.
हत्येचा संशय आणि चार कर्मचाऱ्यांची चौकशी
या प्रकरणात पोलिसांनी ढाब्यावर काम करणाऱ्या चार संशयित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमनेही भेट देऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. जरी आत्महत्येची चर्चा असली, तरी मृतदेह अशा प्रकारे गुप्तपणे गाडण्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असावे, असा संशय पोलिसांना आहे. ही केवळ आत्महत्या आहे की नियोजित हत्या, याचा उलगडा आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच होईल. आरोपींनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठीच हा मार्ग अवलंबल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या घटनेमुळे ढाबा संस्कृतीतील अंधाधुंद कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











