Monsoon Update: महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट.. वादळी वारे अन् मुसळधार पाऊस!

मुंबई तक

• 10:26 PM • 10 Jun 2026

मान्सूनने अखेर दक्षिण महाराष्ट्र व्यापला असून देवगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात हजेरी लावली आहे. जाणून घ्या कुठे-कुठे देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट.

monsoon update 2026 imd june 10 weather exactly where in maharashtra has an orange alert been issued gusty winds and heavy rain forecast

Monsoon Update (प्रातिनिधिक फोटो)

Google CTA

मुंबई: देशभरात अनेक ठिकाणी नागरिकांना सध्या वाढते तापमान आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने उष्णता कायम असून वातावरणात प्रचंड आर्द्रता जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार मान्सूनची प्रगती सध्या मंदावली असून त्यामागे काही महत्त्वाची हवामानशास्त्रीय कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचलं का?

मान्सून कुठपर्यंत पोहोचला?

सध्या ईशान्य भारतातील सेवन सिस्टर्सचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे स्वरूप सर्वत्र एकसमान नाही. अनेक ठिकाणी केवळ तुरळक आणि विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यभर किंवा संपूर्ण प्रदेशात एकाच वेळी पावसाची स्थिती निर्माण झालेली नाही.

हे ही वाचा>> पुणे: पेटता सिलेंडर बाहेर फेकला पण... आई-वडिलांसह मुलाचा जागीच गेला जीव, काळीज पिळवटून टाकणारी घटना!

महाराष्ट्रातही मान्सून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर परिसरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, राज्यभर मुसळधार पावसाचे चित्र अद्याप दिसत नाही.

मान्सूनचा वेग का मंदावला?

हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात सध्या कोणतेही प्रभावी कमी दाबाचे क्षेत्र किंवा हवामान प्रणाली सक्रिय नाही. अशा प्रणालींमुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. मात्र सध्या अशी परिस्थिती नसल्याने मान्सूनची आगेकूच संथ झाली आहे.

याशिवाय गुजरात आणि उत्तर अरबी समुद्र परिसरात निर्माण झालेल्या शक्तिशाली अँटीसायक्लोनचाही परिणाम मान्सूनवर होत आहे. या अँटीसायक्लोनमुळे कोरडी हवा तयार होत असून ती दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करत आहे. परिणामी महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर भारताच्या दिशेने मान्सूनचा वेग कमी झाल्याचे दिसून येत आहे.

कोकण, गोवा आणि महाराष्ट्रासाठी काय अंदाज?

10 ते 16 जूनदरम्यान गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 आणि 11 जून रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा>> 5 वर्षाच्या पुतण्याने काकाला 'त्या' महिलेसोबत 'नको त्या' अवस्थेत पाहिलं, काकाने मुलासोबत..

याशिवाय कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पाऊस पडू शकतो. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दमट उकाडा का वाढला?

मान्सूनची प्रगती मंदावल्याने वातावरणात ओलावा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र त्याचवेळी पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नसल्याने तापमानात फारशी घट झालेली नाही. त्यामुळे 'हॉट अँड ह्युमिड' म्हणजेच उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत आहे.

विदर्भात तापमान 44 अंशांपर्यंत

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार विदर्भातील काही भागांमध्ये तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव अद्याप कायम असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातील अलर्ट

10 जून

  • पालघर जिल्ह्यात उष्णतेसाठी यलो अलर्ट.
  • घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसासाठी यलो अलर्ट.
  • विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा.

11 जून

  • रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट.
  • हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता.

12 जून

  • बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट.
  • बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये यलो अलर्ट कायम.
  • काही भागांत जोरदार पावसाची शक्यता.

पुढील काही दिवस कसे असतील?

तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास मान्सूनला पुन्हा गती मिळू शकते. तोपर्यंत महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत दमट उकाडा, ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि तुरळक पावसाचे स्वरूप कायम राहण्याची शक्यता आहे.

सध्या तरी मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय झालेला नसला तरी येत्या काही दिवसांत हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.